उमेदवारी अर्ज कधी भरायचा या पेचात उमेदवार

election
पुणे – विधानसभा निवडणुकांचे पडघम राज्यात जोरात बडविण्यास सुरवात होत असतानाच निवडणुकीचा उमेदवारी अर्ज कधी दाखल करावा या पेचात इच्छुक उमेदवार सापडले आहेत. निवडणुक आयोगाने महाराष्ट्रात १५ आक्टोबर ही विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. मात्र उमेदवारांना निवडणूक अर्ज भरण्यासाठी २० ते २७ सप्टेंबर अशी मुदत दिली आहे आणि हीच उमेदवारांसाठी अडचणीची बाब ठरते आहे.

मुळातच अजून कुणाला उमेदवारी मिळणार हे कुठल्याच पक्षाने जाहीर केलेले नाही. जागावाटपात समझोते होताना दिसत असले तरी इच्छुक उमेदवारांतून नक्की कुणाची लॉटरी लागणार हे अजून स्पष्ट नाही. महत्त्वाचे बहुतेक सर्वच पक्ष बंडखोरी टाळण्यासाठी अगदी ऐनवेळी उमेदवारांच्या नावाची घोषणा करतात. मात्र यंदा २४ सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा अस्तित्वात आला असला तरी सर्वच पक्षांचे उमेदवार अर्ज भरताना शुभदिवस आणि शूभमुहुर्त पाहूनच अर्ज भरतात. २४ सप्टेंबरला सर्वपित्री अमावस्या आहे म्हणजे त्यापूर्वी अर्ज भरणे अवघड आहेच पण अगदी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांना ज्योतिषांनी हा दिवस वैधृती म्हणजे कुयोग असल्याचे सांगितले आहे.

याचाच अर्थ उमेदवारांसाठी २५ आणि २६ सप्टेंबर हे दोनच दिवस हातात आहेत. पैकी २५ ला घटस्थापना आहे. हा शूभमुहूर्त असला तरी या दिवसांतला कांही काळही अर्ज दाखल करण्यासाठी योग्य नसल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे. यामुळे तिकीट मिळाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना अगदी थोडा काळ हाती राहणार आहे.

Leave a Comment