जनरल मोटर्स आणणार ४० नवी मॉडेल्स

gm
भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात जनरल मोटर्स येत्या चार वर्षात ४० नवी मॉडेल्स सादर करणार असल्याचे कंपनीच्या सीईओ मेरी बारा यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट त्यांनी नुकतीच घेतली असून पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. मोदींची भेट त्यांचे अभिनंदन करण्यासाठी घेतली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बारा वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण यांनीही भेटल्या आहेत.

बारा म्हणाल्या की यूएस मध्ये २०१३-१४ सालात कंपनीने ३२ नवीन मॉडेल्स दार केली आहेत. चीनमध्ये भागीदारांसह याच काळात नवीन आणि अपग्रेड केलेली अशी १७ मॉडेल्स कंपनीने आणली आहेत व आंतरराष्ट्रीय बाजारात ४० नवीन मॉडेल्स सादर केली जाणार आहेत. त्यात भारताचा समावेश आहे.

बारा भारत दौर्‍यात पुरवठादार, वितरक यांनाही भेटणार आहेत. त्या म्हणाल्या , भारतीय बाजार अत्यंत महत्त्वाचा असून तज्ञांच्या मते २०२० पर्यंत भारत ही जगातील तिसरी मोठी बाजारपेठ असणार आहे. त्यामुळे आम्हाला मोठी संधी आहे. भारतासाठी सादर होणारी मॉडेल्स भारतीय हवामान आणि येथील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बनविली जात आहेत. या मॉडेल्समध्ये केवळ सुरक्षितता नाही तर उत्तम गुणवत्ताही असेल. कंपनीने १९९६ पासून भारतात प्रवेश केला असून आत्तापर्यंत १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

Leave a Comment