सिक्युरिटी गार्ड

security-gaurd
विविध संस्था, संघटना, कार्यालये आणि कारखाने यांची सुरक्षा सेवा हा एक चिंतेचा विषय झालेला असतो. कारण या सर्वांना रखवालदारांची फार गरज असते. पूर्वी बड्या श्रीमंत लोकांच्या बंगल्यामध्ये असे रखवालदार बसलेले असत. ते जाणार्‍या-येणार्‍या लोकांवर वॉच ठेवत असत, म्हणून त्यांना वॉचमनही म्हणतात. आता तर मोठ्या शहरांमधून घरांची रचनाच बदलून गेली आहे. खुल्या जागांच्या किंमती भरमसाठ वाढल्यामुळे अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेऊन राहणे त्यातल्या त्यात परवडायला लागले आहे. एका मोठ्या कंपाऊंडवॉलमध्ये १० पासून १०० पर्यंत अपार्टमेंटस् बांधले जायला लागले आहेत. अशा प्रचंड मोठ्या वसाहतीत वॉचमन ही संस्था अपरिहार्य ठरली आहे. अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटमध्ये राहणारी व्यक्ती स्वत:चे घर बांधून राहिली असती तर तिला स्वत:च्या रखवालदाराची गरज भासली नसती. परंतु अपार्टमेंटमध्ये रहायला गेल्यानंतर सर्वात मिळून एखादा किंवा अनेक वॉचमन ठेवणे त्यांना गरजेचे झाले आहे. अशा प्रचंड वसाहतींना केवळ एकच प्रवेशद्वार ठेवून चालत नाही. दोन-तीन वेगवेगळी प्रवेशद्वारे असतात आणि त्या प्रवेशद्वारातून कोण येत आहे, कोण जात आहे यावर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर या वसाहतींचे स्वरूप एवढे बदलून गेलेले आहे की, वॉचमनशिवाय वसाहत अशक्य आहे.

वसाहतीत बाहेरून येणार्‍या व्यक्तींवर लक्ष ठेवणे, त्यांची नावे लिहून घेणे, त्यांना हव्या असलेल्या पत्त्याचा शोध लावून देणे, लिफ्टच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवणे, पाणी सोडणे, बंद करणे, भटके प्राणी वसाहतीत येणार नाहीत यावर लक्ष ठेवणे अशा किती तरी कामांसाठी एका छोट्या अपार्टमेंटमध्येही किमान तीन वॉचमन आवश्यक असतात. काही ठिकाणी वसाहतीतली आतली साफ-सफाई आणि दिवाबत्तीची व्यवस्था वॉचमनच करतात. मात्र वॉचमन मिळवणे आणि त्यांच्या पाळ्या बदलत राहणे हे काम करायला कोणत्याही वसाहतीतल्या सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना वेळ नाही. त्यातूनच एक व्यवसाय निर्माण झाला आहे. माजी सैनिक किंवा तत्सम व्यक्तींची संघटना बांधून वॉचमन हव्या असणार्‍या संस्थांशी संधान साधून त्यांना वॉचमन उपलब्ध करून देणे हे काम या व्यवसायात केले जाते. अनेक मोठ्या शहरांमध्ये असे काम करणार्‍या एजन्सीज् मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. आजकाल अनेक सरकारी कार्यालयांनी सुद्धा वॉचमन म्हणून कोणाला नोकरीवर न ठेवता अशा कंत्राटदारांकडूनच हंगामी स्वरूपाचे वॉचमन घेण्यावर भर दिला आहे. काही बँका, शासकीय कार्यालये किंवा निमशासकीय कार्यालये यांचा अशा संस्थांत समावेश होतो.

आजकाल अगदी लहान-मोठ्या उद्योगांनी सुद्धा वॉचमन ठेवायला प्रारंभ केलेला आहे. तो अनेक अर्थांनी उपयुक्त असतो. सध्या आणखी एका यंत्रणेला वॉचमन गरजेचा झाला आहे, ती संस्था म्हणजे एटीएम सेंटर. एटीएम सेंटर २४ तास उघडे असते. त्यामुळे तिथे किमान दोन किंवा तीन वॉचमन ठेवणे गरजेचे असते. दहा लाख लोकवस्तीच्या एखाद्या गावाचा या दृष्टीने सर्व्हे केला तर असे लक्षात येते की, अशा एखाद्या शहरामध्ये कमीत कमी १० हजार लोकांना तरी वॉचमन म्हणून नोकरी मिळू शकते आणि त्यांची ही मोठी गरज लक्षात घेतल्यानंतर वॉचमनचा पुरवठा करणार्‍या एजन्सीच्या कामाचा व्याप ध्यानात येतो. त्यासाठी सिक्युरिटी गार्ड एजन्सी स्थापन करावी लागते आणि या एजन्सीतर्फे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करू शकणार्‍या लोकांची भरती केली जाते. दुसर्‍या बाजूला सिक्युरिटी गार्डची सेवा हव्या असलेल्या संस्थांची यादी केली जाते. अशा संस्था आणि आपल्याकडे उपलब्ध असलेले सिक्युरिटी गार्ड यांचा मेळ घालण्याचे काम या एजन्सीला करावे लागते. थोड्या वेगळ्या पद्धतीने बोलायचे झाल्यास ही एजन्सी म्हणजे सिक्युरिटी गार्डस्ची प्लेसमेंट सर्व्हिस आहे. मात्र या दोन्हीत थोडा फरक आहे.

सिक्युरिटी गार्डच्या एजन्सीला एखाद्या संस्थेला एखादा वॉचमन मिळवून दिला की, नामानिराळे होता येत नाही. आपल्याकडे नोंदल्या गेलेल्या संस्थांची सिक्युरिटी गार्डची गरज निरनिराळी असते. गार्डची मागणी करणारी संस्था कोणती आहे, तिथल्या वॉचमनला कोणत्या स्वरुपाचे काम करावे लागणार आहे याचा विचार करून त्या क्षमतेचा सिक्युरिटी गार्ड तिकडे पाठवला पाहिजे. शिवाय तो गार्ड म्हणून आपली कामे व्यवस्थित करत आहे की नाही, यावर लक्ष ठेवले पाहिजे. हा नेमलेला गार्ड व्यवस्थित काम करत नसेल तर त्याजागी दुसरा चांगल्या क्षमतेचा गार्ड पाठवला पाहिजे. शिवाय अशा गार्डांच्या पाळ्या बदलत्या ठेवाव्या लागतात. सातत्याने रात्रपाळी देऊन चालत नाही. हे सगळे व्यवस्थापन ही एजन्सी करत असते. सिक्युरिटी गार्डची सर्व्हिस घेणारी संस्था गार्डला थेट पगार देत नाही. गार्डची सेवा देणार्‍या संस्थेला तिच्याशी झालेल्या करारानुसार एक ठराविक रक्कम दिली जाते. त्या रकमेतून एजन्सी गार्डाला पगार देते आणि त्यातली काही रक्कम एजन्सी आपल्या व्यवस्थापनाचे खर्च म्हणून ठेवून घेते. गार्डाची नोंदणी करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे इत्यादी कामांबद्दल हा पैसा असतो आणि तो चांगला मिळतो. या व्यवसायासाठी कसलीही आर्थिक गुंतवणूक करावी लागत नाही हे विशेष.

Leave a Comment