
झ्युरिच – फॉम्युर्ला वनचा माजी जगज्जेता मायकल शूमाकरने जीवावर बेतलेल्या संकटावर मात करीत अखेर नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ उपचारानंतर लॉसेन रुग्णालयाने डिस्चार्ज दिला असून शुमाकर घरी परतला आहे.
रुग्णालयातून घरी परतला शूमाकर
शूमाकरच्या व्यवस्थापिका सबीन केहम यांनी शूमाकरवर यापुढील सर्व उपचार घरी होतील अशी माहिती दिली.
शूमाकरसमोर तंदुरुस्त होण्याचे एक खडतर आव्हान असून मागच्या काही महिन्यांमध्ये शूमाकरच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने लॉसेन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला असे केहम यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांनी शूमाकर कुटुंबियांच्यावतीने काळजी घेणा-या सर्व डॉक्टर आणि कर्मचा-यांचेही आभार मानले आहेत.
गेल्यावर्षी डिसेंबर २०१३ मध्ये फ्रान्सच्या आल्पस पर्वतराजीत स्किइंग करताना शूमाकर गंभीर जखमी झाला होता.स्किइंग करताना तोल जाऊन त्याचे डोके दगडावर आपटले होते. शुमाकरला रुग्णालयात आणले तेव्हा तो बेशुध्द होता. स्किइंग करताना त्याने हेल्मेट घातली होती, त्यामुळे दुखापतीची तीव्रता काही अंशी कमी झाली. अन्यथा तो रुग्णालयापर्यंतही पोहोचू शकला नसता, असे त्यावेळी त्याच्यावर उपचार करणा-या ग्रेनोबेल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटले होते.
