राष्ट्रवादीला राष्ट्रीय सरचिटणीस त्रिपाठींची सोडचिट्ठी

ncp
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बसणारे धक्के कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. भाजप-सेनेत प्रदेश पातळीवरील अनेक मराठी नेते सामील होत असताना आता पक्षाचे हिंदी चेहरा असलेले नेतेही आता पक्ष सोडू लागले आहेत.

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रकांत त्रिपाठी यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. त्रिपाठी हे काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत. काँग्रेसशासित सरकारमध्ये त्रिपाठी यांनी नगरविकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. मात्र, पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना करताच त्यांनी पवारांसोबत जाणे पसंत केले होते. त्यानंतर त्रिपाठींना राष्ट्रवादीने पक्षाचे मुंबई शहराचे अध्यक्षपद दिले होते. त्रिपाठी सध्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. मात्र, मागील काही दिवसापासून पक्षाने अडगळीत टाकल्याने पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

त्रिपाठी यांनी सांगितले की, मी सोमवारीच राजीनामा देत असल्याची माहिती पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सोमवारीच दिली आहे. मंगळवारी मी पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. त्रिपाठींनी सांगितले की मी काँग्रेसमध्ये सामील होणार आहे. मंगळवारी त्रिपाठींनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेऊन चर्चा केली.

माजी प्रदेश सरचिटणीसाचाही पक्षाला रामराम- राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राहिलेले जेपी सिंह यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. सिंह गुरुवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेले माजी आमदार अभिराम सिंह हे सुद्धा राष्ट्रवादीत नाराज आहेत. ते सुद्धा पक्षाला लवकरच रामराम करण्याच्या विचारात असल्याचे कळते. अभिराम सिंह यांचा मुलगा डाँ. सत्येंद्र सिंह यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे.

Leave a Comment