मुंबई, डोंबिवलीतील पर्यटक काश्मीरमध्ये अडकले

kashmir-flood
मुंबई – मुंबई, ठाण्यातील सुमारे १२५ नागरिक जम्मू काश्मीरच्या महापुरामध्ये अडकून पडले असून पुरामुळे वीज, संदेशवहन सा-याच यंत्रणा कोलमडल्याने या कुटुंबांना घरच्यांशी संपर्क साधणे कठीण बनले आहे.

डोंबिवलीतील शिंदे कुटुंबातील तिघे जण या महापुरात अडकले आहेत. सोमवारपासून त्यांचा संपर्क होत नसल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत असून पूर्वेत मिलापनगर येथील आर-८ काचनगंगा या परिसरात राहणारे विक्रांत शिंदे हे पत्नी अर्चना व विवियान या आठ वर्षाच्या मुलीसह ५ सप्टेंबरला श्रीनगरला पोहोचल्यानंतर त्यांनी घरी फोन केला होता.

हॉटेलच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरले असून आम्ही सुरक्षितस्थळी जात असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. मात्र त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शक ला नाही. विक्रांत यांचा दिल्लीत राहणारा मित्र राकेश यांच्या कुटुंबातील पाच जणही त्यांच्यासोबत असून तेही अडकल्याची माहिती शिंदे यांच्या नातेवाइकांनी दिली.

तर बोरिवली पश्चिमेत राहणारे पुरुषोत्तम अग्रवाल हे व्यावसायिक ७ सप्टेंबर रोजी पत्नी कुमकुम अग्रवाल, इशान अग्रवाल, मुलगी खुशबू अग्रवाल, राम अग्रवाल, कैलास अग्रवाल यांच्या सोबत श्रीनगर येथे गेले होते. श्रीनगर येथील ग्रँड ममता हॉटलमधून त्यांनी ७ सप्टेंबर रोजी दुपारी कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क साधला. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून अग्रवाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे अग्रवाल यांचे मेहूणे भानुप्रसाद मिश्रा यांनी सांगितले.

Leave a Comment