बेदरकार चालक संतोष मानेची फाशी कायम

mane
पुणे – २०१२ सालात स्वारगेट बस स्थानकातून बस पळवून शहरभर ती बेदरकार चालवून ९ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संतोष माने याची फाशी मुंबई उच्च न्यायांलयाने कायम केली असून त्याला त्या विरोधात सुप्रीम कोर्टात अपील करता येईल असा निर्णय दिला आहे.

दोन वर्षांपूर्वी संतोष माने या बसचालकाने पुण्यात भर गर्दीच्या रस्त्यात बेदरकारपणे बस चालविली आणि त्यात रस्त्यावरून जात असलेल्या ९ निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते. माने याने शहरात १६ किमीचे अंतर असे वेगाने तोडले होते. रात्रपाळी ऐवजी दिवसपाळी द्यावी अशी विनंती त्याने वरीष्ठांकडे केली होती मात्र ती मान्य न झाल्याने नाराज झालेल्या माने याने बसस्थानकात उभी असलेली बस पळवून ती शहरात बेफाम चालविली होती.

त्याच्याविरूद्ध चालविल्या गेलेल्या दाव्यात पुणे न्यायालयाने त्याला फाशी सुनावली होती. त्यावर त्याने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. संतोष च्या वकीलांनी तो मानसिक रूग्ण असल्याचा केलेला दावा अमान्य करून न्यायाधीशांनी त्याची फाशीची शिक्षा कायम केली आहे. वास्तविक न्यायालयाने त्याला ऑगस्टमध्येच दोषी ठरविले होते मात्र शिक्षा सुनावली नव्हती.

Leave a Comment