अमेरिका आयएसआयएसचे नामोनिशाण ३ वर्षात मिटविणार

us
वॉशिग्टन – इराक आणि सिरीयातील कांही भागावर कब्जा करून स्वतंत्र इस्लामिक स्टेटची घोषणा करणार्‍या आयएस्रआयएस दहशतवादी संघटनेचे नामोनिशाण तीन वर्षात पूर्णपणे मिटविण्याची योजना अमेरिकेने तयार केली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आज अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा देशाला उद्देशून संदेश देणार आहेत त्यात या मोहिमेची माहिती दिली जाणार असल्याचे समजते. ही संघटना जगभर वेगाने पसरत चालली आहे आणि या दहशतवाद्यांनी शेकडो निरपराध नागरिकांच्या हत्या केल्या आहेत.

आयएसआयएसचा खातमा करण्यासाठी ओबामा प्रशासनाने तीन टप्प्यांची योजना आखली असल्याचे पेंटागॉनने जाहीर केले आहे. ओबामा देशाला उद्देशून जो संदेश देणार आहेत त्यात अमेरिकेच्या सैन्याने इराक सिरीयात सुरू केलेल्या कारवाईची माहिती देऊन जनतेला विश्वासात घेतले जाणार आहे. ओबामा यावेळी अमेरिकेला युद्धात ढकलले जाणार नाही असा विश्वास जनतेला देणार आहेत त्याचवेळी आयएसआयएसचे साम्राज्य नष्ट करणार असल्याची घोषणाही करणार आहेत.

आयएसआयएस खातम्याची योजना तीन टप्प्यांची आहे. पैकी पहिल्या टप्प्यातील कारवाई गेल्या माहिन्यातच सुरू करण्यात आली असून त्या अंतर्गत अमेरिकन हवाई दलाने सुन्नी दहशतवाद्यांनी कब्जा केलेल्या भागावर १४५ हवाई हल्ले केले आहेत. अल्पसंख्यांक, अमेरिकी राजनितीक अधिकारी आणि सैनिक सुरक्षेवर भर दिला जात आहे तसेच दक्षिण उत्तर भागावर कब्जा केलेल्या या दहशतवाद्यांना हुसकून लावण्याची कारवाईही केली जात आहे.

दुसर्‍या टप्प्यात इराकमध्ये नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर इराकी सैनिक आणि कुर्दिश लढवय्यांना आयएसआयएस विरूद्ध लढण्यासाठीचे प्रशिक्षण देणे आणि त्यांना अत्याधुनिक शस्त्रे पुरविणे याचा समावेश आहे. तिसरा टप्पा थोडा वादग्रस्त असून त्यात सिरीयात हे दहशतवादी असलेल्या बालेकिल्यात घुसून त्यांना ठार करण्याची योजना आहे. या सर्व मोहिमेसाठी ३६ महिन्यांचा कालावधी लागेल असे जाहीर करण्यात आले आहे.

Leave a Comment