सोलापूर जिल्ह्यात सेनेचे राष्ट्रवादीला जबरदस्त आव्हान

ncp
सोलापूर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुका या जिल्ह्यात मोठे राजकीय परिवर्तन आणणार्‍या ठरणार आहेत. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड समजल्या जाणार्‍या या जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना मोठी गळती लागली आहे. मावळत्या विधानसभेत सोलापूर जिल्ह्यातल्या ११ पैकी ५ जागा राष्ट्रवादीकडे आहेत. मात्र त्या पाचही जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर यावेळी शिवसेनेचे जबर आव्हान उभे केले आहे. कारण या सर्व मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आणि कॉंग्रेसच्या काही मातबर नेत्यांनी आपल्या पक्षाचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशा नेत्यांमध्ये पंढरपूरचे कॉंग्रेसचे नेते कल्याणराव काळे हेही आहेत. पंढरपूर मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत मोठा इतिहास घडला होता. सोलापूर जिल्ह्यातील अपराजित समजले जाणारे राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचा या मतदारसंघात अपक्ष उमेदवार भारत भालके यांनी दारूण पराभव केला होता. या पराभवात ज्यांचा सिंहाचा वाटा किंवा सहकार्य होते ते कॉंग्रेसचे नेते कल्याणराव काळे आता शिवसेनेत आले आहेत. हा कॉंग्रेसला मोठा धक्का आहे.

या पक्षांतरामुळे पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघात महायुतीची ताकद वाढली आहे. त्यातच पंढरपूरचे सलग चार वेळा निवडून आलेले माजी आमदार आणि एस.टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांची स्वाभीमानी शेतकरी संघटनेतून उमेदवारी जाहीर झालेली आहे. प्रशांत परिचारक हे जिल्हा दूध संघाचे चेअरमन सुद्धा आहेत. त्यामुळे भारत भालके आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोघांपुढेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. भारत भालके यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव केला आहे, परंतु भालके स्वत: कोणत्या पक्षाचे आहेत याचा पत्ता लागत नाही. त्यांचे पूर्वी शिवसेनेशी संबंध होते, नंतर त्यांनी कॉंग्रेसशी सलगी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच एका गटाची मदत झाली. त्यामुळे त्यांचा कल नेमका कोणाकडे आहे हे स्पष्ट होत नाही. त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेलच, पण त्यांचे नजिकचे सहकारी महायुतीत गेले असल्याने त्यांच्या मतांत मोठीच घट होईल. माळशिरस मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धवलसिंह मोहिते-पाटील हे शिवसेनेत आले आहेत. त्यांचे वडील प्रतापसिंह माेहिते-पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने अस्थिर आहेत. ते एकदा भाजपाचे खासदार सुद्धा झाले होते आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या बंधूंना आव्हान दिले होते. आता त्यांचे चिरंजीव शिवसेनेत आले आहेत.

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांनीही कॉंग्रेसचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यांच्या या पक्षांतराचा उपद्रव सुशीलकुमार शिंदे यांच्या आमदार कन्या प्रणिती शिंदे यांना होऊ शकतो. बार्शी मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि नंतर राष्ट्रवादीत गेलेले सध्याचे पालक मंत्री दिलीप सोपल यांना २००४ साली पराभूत केलेले शिवसेनेचे राजेंद्र राऊत हे नारायण राणे यांच्या मागे कॉंग्रेसमध्ये गेले होते. पण आता ते शिवसेनेत परतले आहेत. त्यांच्यामुळे दिलीप सोपल यांच्यासमोर अडचणी निर्माण होणार आहेत. दक्षिण सोलापूरचे आमदार दिलीप माने यांनी निवडणुकीची मोठी तयारी केलेली आहे. परंतु त्यांनी अनेकांना नाराज केलेले आहे. परिणामी मोदी लाट, कॉंग्रेसविरोधी वातावरण यांच्या सोबतच या नाराज लोकांची नाराजी यामुळे ते पराभवाच्या छायेत आहेत. या मतदारसंघात त्यांना पुन्हा तिकीट देऊ नये यासाठीच कॉंग्रेसमधला एक मोठा गट कार्यरत आहे. त्यातल्या कोणालाही तिकीट न मिळाल्यास ते शिवसेनेत जाऊन तिकीट मिळविण्याच्या तयारीला लागले आहेत.

माढा, मोहोळ हे दोन राष्ट्रवादीचे मतदारसंघ तसे सुरक्षित आहेत. परंतु माढा मतदारसंघातील आमदार बबनदादा शिंदे यांचेच बंधू संजय मामा शिंदे कसलीही राजकीय महत्वाकांक्षा पुरी होत नसल्याने नाराज आहेत. त्यांचीही शिवसेनेशी सलगी होत असल्याचे वृत्त आहे. शहर उत्तर सोलापूर मतदार संघात भाजपाचे आमदार विजय देशमुख यांच्या विरोधात भाजपाचाच एक गट सातत्याने कारवाया करत आहे. मात्र या कारवाया करणार्‍यांमध्ये कोणातही निवडून येण्याची क्षमता नाही. त्यांच्या कारवायांचा त्रास मात्र देशमुख यांना होणार आहे. कॉंग्रेसचे माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते भाजपातल्या या फुटीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या हातात असलेला आणखी एक मतदार संघ म्हणजे अक्कलकोट. या मतदारसंघात सिद्रामप्पा पाटील हे निवडून आलेले आहेत, मात्र आता त्यांना निवृत्तीचा सल्ला दिला जात आहे. या तालुक्यात भाजपाच्या इच्छुकांची संख्या तीन डझन आहे. परंतु त्यापैकी कोणातही कॉंग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना पराभूत करण्याची ताकद नाही. सिद्रामप्पा पाटील हेच हा मतदारसंघ राखू शकतात. सोलापूर जिल्ह्यात माढा, मोहोळ, माळशिरस हे राष्ट्रवादीचे तीन मतदारसंघ शाबूत राहतील. बाकीचे दोन मतदारसंघ शिवसेना जिंकेल असे आजचे वातावरण आहे. कॉंग्रेसचेही दोन गड डळमळीत आहेत. या जिल्ह्यातल्या सांगोला मतदारसंघात शे.का. पक्षाचे गणपतराव देशमुख दहा वेळा निवडून आलेले आहेत. यावेळेस ते अकराव्यांदा निवडून येतील अशी शक्यता आहे.

Leave a Comment