तपास यंत्रणाच वादाच्या भोवर्‍यात

sinha
सीबीआयचे प्रमुख रणजित सिन्हा हे संशयाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. त्यांच्या घराला कोळसा आणि टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींनी भेटी दिल्याच्या आरोप आहे. विशेष म्हणजे आपण असे काही वर्तन केलेले नाही असे सीबीआय प्रमुख छातीठोकपणे सांगत नाहीत. तसे लेखीही द्यायला तयार नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील आरोपी सीबीआय प्रमुखांना भेटत असतील तर त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या चौकशीच्या काही प्रकरणांबाबत आपल्याला फेरविचार करावा लागेल असे न्यायालयाने म्हटले आहे. सीबीआय प्रमुख रणजित सिन्हा यांच्या घराला भेट दिलेल्यांच्या नोंदी सर्वोच्च न्यायालयासमोर आणण्यात आल्या आहेत. अशा आरोपींच्या भेटी सीबीआय प्रमुख घेत असतील आणि त्या भेटीतून त्यांच्या हातात असलेल्या प्रकरणांच्या चौकशीवर काही परिणाम होत असेल तर आपण स्वत:च अशी पूर्ण चौकशी स्वत:च्या निगराणीखाली करू, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

यातला मूळ प्रश्‍न मोठा गंभीर आहे. देशातल्या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणार्‍या सीबीआयचे प्रमुखच संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. या देशात भ्रष्टाचार अमाप आहे, पण पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, सीबीआयचे प्रमुख, राष्ट्रपती अशा महनीय व्यक्तींविषयीच संशय व्यक्त केला जातो, तेव्हा तो चिंतेचा विषय ठरतो. आपली राज्यघटना तयार करताना अशा महनीय व्यक्तींना आणि पदांना स्वायत्त अधिकार देण्यात आलेले आहेत. अण्णा हजारे यांनी गेल्या काही वर्षात लोकपाल नेमला जावा यासाठी मोठे आंदोलन केले. लोकसभेमध्ये एक लोकपाल विधेयक चर्चिले जात होतेच, पण अण्णांनी आपल्या कल्पनेतला लोकपाल कसा असेल याचे चित्र मांडले, त्याला जनलोकपाल म्हटले. हा जनलोकपाल फार प्रामाणिक असेल आणि तो भ्रष्टाचार नष्ट करील अशी अण्णांची कल्पना होती. म्हणूनच त्याला बरेच अधिकार देण्याची शिफारस अण्णांच्या पर्यायी जनलोकपाल विधेयकात करण्यात आलेली होती. अण्णांनी सीबीआय ही यंत्रणा शासनाच्या नियंत्रणाखाली असू नये, असाही आग्रह धरला होता. जनलोकपाल आणि सीबीआय प्रमुख देशातल्या सार्‍या भ्रष्टाचाराचे निखंदन करून टाकतील अशी त्यांची कल्पना होती, अजूनही आहे. मात्र सीबीआयचा प्रमुख आणि जनलोकपाल हे प्रामाणिकच असतात हे त्यांचे म्हणणे सत्य नव्हते. सीबीआयचा प्रमुख झाला काय की जनलोकपाल झाला काय ही शेवटी माणसेच आहेत. ते कोणत्याही क्षणी भ्रष्ट होण्याची शक्यता असते. भारतीय घटनेने तसे मानलेले आहे.

सध्याचे सीबीआयचे प्रमुख रणजित सिन्हा हे स्वत:च भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत आहेत असा आरोप झालेला आहे. सीबीआय ही भारताची सर्वात वरिष्ठ गुन्हे अन्वेषण यंत्रणा आहे. मात्र या यंत्रणेचेच हात भ्रष्टाचाराने बरबटलेले असतील तर ही यंत्रणा नि:पक्षपातीपणे आपल्या हातातला तपास करू शकेल, असा प्रश्‍न विचारला जात आहे. सीबीआयकडे अनेक प्रकरणांची चौकशी सोपवली गेलेली असते. त्यामुळे अशा प्रकरणात ज्यांचे हात गुंतलेले असतात असे लोक आपली चौकशी फार कसोशीने होऊ नये याबाबत त्यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता असते. म्हणून चौकशी खालील प्रकरणातील आरोपी त्यांना भेटतात की नाही यावर काही लोकांची नजर असते. सीबीआयच्या प्रमुखांनी अशा लोकांना भेटायलाच नको आहे. मात्र रणजित सिन्हा यांच्या घरी अशा काही आरोपींनी वारंवार भेट दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे आणि त्यावर आता सर्वोच्च न्यायालयात चर्चा सुरू आहे. रणजित सिन्हा यांच्या घरी आलेल्या आणि गेलेल्या लोकांचे नावाचे रजिस्टर आहे आणि त्यावर कोळसा घोटाळ्यातील आरोपी आल्या-गेल्याच्या नोंदी आहेत.

एवढेच नव्हे तर हे आरोपी कधी आले, कधी गेले आणि त्यांनी सीबीआय प्रमुखांची घरी किती वेळ थांबून चर्चा केली याच्याही नोंदी या रजिस्टरमध्ये आहेत. काही आरोपी त्यांना भेटून गेले आणि त्यातल्या काही आरोपींची नावे नंतर खटले उभारताना वगळली गेली. या गोष्टींचा संबंध जोडला जात आहे. या आरोपींनी त्यांच्या घरी येऊन त्यांना आपल्यावरचे खटले मागे घेण्याची विनंती केली असणार आणि त्यांनी गळ घातल्यामुळे सीबीआय प्रमुख त्यांच्या गळाला लागले असणार असा कोणी अर्थ काढला तर तो चुकीचा ठरत नाही. परंतु सीबीआय प्रमुखाच्या वकिलांनी याबाबत पूर्णपणे आक्रमक भूमिका घेतली आहे. या आरोपींनी त्यांची घरी भेट घेतली आहे म्हणजे ती वैयक्तिक भेट आहे आणि त्या भेटींचे तपशील जाहीर करणे ही त्यांच्या वैयक्तिक जीवनातली ढवळाढवळ ठरते, असा पवित्रा या वकिलाने घेतला आहे. क्षणभर त्यांचे म्हणणे मान्य केले तरी काही गोष्टी विचाराव्याशा वाटतात. या आरोपींचे आणि सीबीआय प्रमुखांचे वैयक्तिक, कौटुंबिक किंवा प्रेमाचे संबंध असतील तर त्यांच्या भेटीच्या नोंदी का ठेवल्या गेल्या? तसे संबंध खरोखर असतीलच तर ते कसे निर्माण झाले याचाही खुलासा झाला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे हे वैयक्तिक संबंध असणारे लोक कोळसा घोटाळ्यातले आरोपी आहेत हे ज्या क्षणी सीबीआय प्रमुखाला कळले त्याच क्षणी त्यांनी स्वत:हून चौकशीपासून दूर व्हायला हवे होते.

Leave a Comment