अनुवाद सेवा

trans
कसलेही भांडवल न गुंतवता करता येणारा आणि उत्तम कमाई करून देणारा हा एक व्यवसाय आहे. परंतु हा व्यवसाय करू इच्छिणार्‍या व्यक्तीचे एकापेक्षा अधिक भाषांवर प्रभुत्व असण्याची गरज असते. त्यातल्या त्यात इंग्रजी, हिंदी आणि आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची प्रादेशिक भाषा या तीन भाषा तरी त्याला चांगल्या अवगत असल्या पाहिजेत आणि या तिन्ही भाषांमधून लिखाण करण्याची क्षमता त्याच्याकडे असली पाहिजे. जी व्यक्ती अशा तिन्ही भाषांतील साहित्याचे विपुल आणि जागरूकपणे वाचन करते अशा व्यक्तीला लिखाणाची शैली ज्ञात असेल तर अनुवाद सेवा हा व्यवसाय म्हणून नक्कीच करता येतो. कारण सध्याच्या व्यवहारामध्ये अनुवाद करणार्‍यांची फारच कमतरता आहे. अनुवादाची गरज वेगवेगळ्या पातळ्यांवर असते आणि त्या त्या पातळीवरचा अनुवाद करताना त्या त्या क्षेत्रातील विशिष्ट संकल्पनांची माहिती असण्याची गरज असते. अनुवाद म्हणजे निव्वळ भाषांतर नव्हे. भाषांतरामध्ये एका भाषेतील मजकूर शब्दश: दुसर्‍या भाषेत आणला जात असतो. मात्र अनुवादामध्ये एका भाषेतली एखादी संकल्पना दुसर्‍या भाषेत आणताना तशी शब्दश: आणली जात नाही.

प्रत्येक भाषेला एक संस्कृती जोडलेली असते आणि त्या संस्कृतीतून, राहणीमानातून आणि जनरहाटीमधून काही शब्दप्रयोग, काही वाक्प्रचार आणि काही म्हणी विकसित झालेल्या असतात. त्यांचे रुपांतर करताना त्या तशाच शब्दश: घेतल्या तर हास्यास्पद ठरतात आणि अनुवाद वाचणार्‍यांना काही बोध होत नाही. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वाण नाही पण गुण लागला, अशी एक मराठी म्हण आहे. या म्हणीमध्ये ढवळ्या आणि पवळ्या ही बैलाची नावे आहेत. हिंदी भाषेत किंवा इंग्रजी भाषेत किंवा अन्य कोणत्याही भाषेत बैलाच्या जोडीला ढवळ्या-पवळ्याची जोडी असे म्हणण्याची पद्धत नसते. ती मराठीतच आहे. त्यामुळे या म्हणीचा अन्य भाषेत अनुवाद करताना त्या म्हणीमध्ये अनुस्यूत असलेला अर्थ लक्षात घ्यावा लागेल आणि तो अर्थ स्पष्ट करणारा त्या भाषेतला, तिच्याशी निगडित असलेला एखादा वाक्प्रचार वापरावा लागेल. म्हणजे आपल्याला मराठी भाषा जेवढी सखोलपणे ज्ञात असते तेवढीच अनुवादाची ती भाषा सुद्धा अवगत असली पाहिजे. अशा प्रकारचा दोन्ही भाषांचा सखोल अभ्यास असणार्‍या व्यक्ती किंवा लेखक अनेक कथा, कादंबर्‍या, चरित्रे आणि वैचारिक स्वरूपाचे ग्रंथ अनुवादित करून त्यातून चांगली आर्थिक कमाई करू शकतात.
अनुवादाच्या दुसर्‍या कामांमध्ये मात्र भाषेच्या एवढ्या सखोल ज्ञानाची गरज नसते. त्यामध्ये साधारणत: वृत्तपत्रीय लिखाणाचा समावेश होतो. काही स्तंभलेखक इंग्रजीतून स्तंभलेखन करतात आणि त्यांच्या लेखांचा अनुवाद प्रादेशिक भाषांतून छापला जातो. तो अनुवाद करताना संबंधित भाषेशी निगडित असलेल्या संस्कृतीचे ज्ञान असलेच पाहिजे असे काही नाही. कारण अशा लेखांमध्ये माहिती असते. भावना प्रामुख्याने नसतात. शास्त्रीय स्वरूपाची माहिती देणार्‍या ग्रंथांचेही असे अनुवाद करता येतात. फार मोठी ग्रंथ अनुवादित केलेच पाहिजेत असे नाही. आजकालच्या काळात स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तके मोठ्या प्रमाणावर विकली जातात आणि छापलीही जातात. अशा पुस्तकांच्या अनुवादाचे काम तुलनेने सोपे असते. समाजात कार्यरत असलेल्या विविध संस्थांची मासिके किंवा नियतकालिके निरनिराळ्या प्रांतात वितरित केली जातात. त्यामुळे मूळ इंग्रजी नियतकालिकातला काही मजकूर प्रादेशिक भाषेतल्या मासिकात घेतला जातो. विविध संघटनांची प्रसिद्धी पत्रके, आवाहन पत्रके, माहिती पुस्तिका अशांचेही अनुवाद करण्याची गरज असते. तिथे अनुवाद करणार्‍यांची कमतरता भासते. त्यामुळे चांगले भाषाज्ञान असणार्‍या लोकांना हा एक चांगला व्यवसाय म्हणून करता येऊ शकतो.

काही वेळा शासनाची काही पत्रके, आदेश, नियमावली, योजनांचे तपशील यांचा अनुवाद करण्याची गरज पडते. असे अनुवाद करण्यासाठी एक विशिष्ट भाषा वापरली जाते. काही विशिष्ट शब्दही त्या ठिकाणी जरूर असतात. त्यांची माहिती असणारी व्यक्ती अशा अनुवादाचे काम करू शकते. काही वृत्तपत्रांतून आणि सरकारी कार्यालयातून काही जाहीर निविदा काढल्या जातात. त्या मुळात इंग्रजीतून असतात आणि त्यांचे भाषांतर प्रादेशिक भाषेत करावे लागते. अनेक संस्था, संघटना, व्यापारी आस्थापना आणि एजन्सीज् यांना सुद्धा नित्य अशा अनुवादाची गरज पडत असते. तिथेही अनुवाद करणार्‍यांना चांगले काम मिळू शकते. संस्थांचे वार्षिक अहवाल अनुवादित करावे लागतात. काही लोकांना इंग्रजी भाषा अवगत नसते किंवा असली तरी ती म्हणावी तशी प्रभावीपणे वापरता येत नाही. मात्र त्यांना कोठे तरी इंग्रजीतून भाषण करण्याची वेळ येते. तेव्हा त्यांचेच भाषण इंग्रजीत अनुवादित करून द्यावे लागते. अशा लोकांना इंग्रजी जाणणार्‍यांची फार गरज भासते. तिथे अनुवादकाला किंमत येते. काही वेळा एखाद्या सभेमध्ये भाषण करणारा वक्ता इंग्रजीत बोलतो, मात्र समोर बसलेल्या श्रोत्यांना त्याच्या इंग्रजी भाषणाचा प्रादेशिक भाषेत अनुवाद करून ताबडतोब सांगावा लागतो. उत्तम इंग्रजी येणार्‍यांसाठी ही एक छान संधी असते.

Leave a Comment