जनरल मोटर्स आणणार हँड फ्री ड्रायव्हिंग कार

gm
न्यूयॉर्क – जनरल मोटर्स २०१७ सालात त्यांच्या लोकप्रिय कॅडिलॅक ब्रँड कारसाठी हँड फ्री ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी आणणार असल्याचे कंपनीच्या सीइओ मेरी बारा यांनी सांगितले. यामुळे वाहनचालकाला गाडी चालविणे अधिक सुकर होणार आहे. कंपनीकडून या तंत्रज्ञानावर आधारित कॅडिलॅक मॉडेलची कार सुपर क्रूझ नावाने बाजारात आणली जाणार आहे. याच काळात कॅडिलॅक सीटीएस कार टू कार कम्युनिकेशन तंत्रज्ञान सह बाजारात येणार आहे.

हँड फ्री ड्रायव्हिंग तंत्रज्ञानात वाहन चालक कार ऑटो पायलट मोड वर टाकू शकणार आहे. जगभरात वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढते आहे. विशेषतः अति गर्दी असलेल्या युरोपिय देशातून तसेच चीनमधून या तंत्रज्ञानासाठीची मागणी मोठी आहे आणि ग्राहकांनाही हे तंत्रज्ञान हवे आहे यासाठी कंपनीने ते उपलब्ध करून देण्याचे ठरविले असल्याचे बारा यांनी सांगितले. नवीन तंत्रज्ञानामुळे वाहन चालविणे सुरक्षित बनणार आहे आणि सुपरक्रूझ मुळे हा नवा अनुभव चालक घेऊ शकणार आहेत. हँड फ्री ड्रायव्हिंग बरोबरच यात ब्रेक, स्पीड कंट्रोल ही करता येणार आहे.

कार टू कार कम्युनिकेशनमुळे हायवेवर गाडी चालविताना वाहतूक गोंधळ असल्यास त्याची सूचना चालकांना मिळणार आहे. हे तंत्रज्ञान आजही वापरात आहे मात्र जनरल मोटर्सच्या या तंत्रज्ञानासह असलेल्या कारमध्ये चालकाला सेफटी फिचर्स कार्यान्वित करताच धडक बसण्याची शक्यता असल्यास त्याची सूचना मिळेल तसेच गर्दी वाढत असल्यास त्याचीही सूचना मिळणार आहे.

Leave a Comment