जम्मू काश्मीर संकटात

kashmir2
सातत्याने अतिरेकी कारवाया आणि विभाजनवादी चर्चा यामुळे अशांत बनलेल्या काश्मीरला बसलेला पुराचा तडाखा एवढा जबरदस्त आहे की हे पृथ्वीवरचे नंदनवन पूर्ववत होण्यास येती पाच ते सात वर्षे काम करावे लागेल. आता या स्वर्गाची पावसाने आणि पुराने एवढे हाल करून टाकले आहेत की, त्याला स्वर्ग म्हणायला जीव धजावत नाही. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी या नुकसानीची हवाई पाहणी केली. त्यांनाही हवामानाच्या खराबीमुळे काश्मीर खोर्‍याची हवाई पाहणीही करता आली नाही. मात्र त्यांनी जे काही पाहिले त्यावरून त्यांनी ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर केले. काश्मीर सरकार हे प्रामुख्याने केन्द्र सरकारच्या अनुदानावर चालते त्यामुळे पंतप्रधानांनी राज्य सरकारला केन्द्राने दिलेल्या अनुदानातून एक हजार कोटी रुपये संकटाशी सामना करण्यासाठी खर्च करावेत असे आदेश दिले. प्रत्यक्षात त्यांनी पाहणी पूर्ण केली तेव्हा केन्द्र सरकारच्या वतिने त्यांनी आणखी अकराशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली. काश्मीरला लगत असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमध्येही पूर आला आहे आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतालाही पुराचा धोका आहे. मोदी यांनी याही भागांना मानवतेच्या भावनेतून मदत करण्याची तयारी दाखवली.

ही स्थिती अभूतपूर्व असून सारे राज्य जलमय झाले आहे. गेल्या पन्नास वर्षात झाला नसेल असा हा नैसर्गिक प्रकोप आहे. जम्मू-काश्मीरच्या जनतेला तीव्र थंडी आणि बर्फवृष्टी यांचा नेहमीच सामना करावा लागतो. परंतु पुरासारखे संकट त्यांच्यावर अभावाने कोसळते. तसे ते आता कोसळले आहे आणि अभूतपूर्व पावसामुळे नद्या दुथडी भरून वहात आहेत. त्याचबरोबर अनेक गावे जलमय झाली आहेत. जम्मू-काश्मीरची भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे. त्यातच तिथे गेली चार दिवस सलग मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. असा प्रसंग या राज्यावर आल्याचे आपल्याला तरी आठवत नाही असे या भागातले बुजुर्ग लोक सांगत आहेत. पंजाबला सुजलाम सुफलाम करणार्‍या बर्‍याच लहान-मोठ्या नद्या जम्मू-काश्मीरच्या पहाडी प्रदेशात उगम पावतात आणि डोंगराच्या उतरणीवरून सुसाट वेगाने मैदानी प्रदेशाकडे धाव घेतात. पाऊस मर्यादित असतो तेव्हा डोंगर उतरणीवरून अल्लडपणे धावणार्‍या या नद्या छोट्या असतात. परंतु या सगळ्याच नद्या आता सततच्या पावसामुळे अल्लड राहिल्या नसून धोकादायक झाल्या आहेत. डोंगराच्या उतरणीला असलेली गावे त्यामुळे संकटात सापडली आहेत. एरवी या नद्या अशा गावांना वळसा घालून आणि गावकर्‍यांना फार त्रास न देता उतारावरून वेगाने पुढे धावत असत. पण आता त्यांचे प्रवाह मोठे झाले असल्यामुळे गावाला वळसा घालण्याऐवजी या नद्या गावाला कवेत घेऊन पुढे जायला लागल्या आहेत.

त्यामुळे डोंगर उतार संपल्याबरोबर जे भाग असतात त्यांच्यामध्ये पाणी भरपूर साचले आहे. कारण ते वेगाने पुढे सरकत नाही. काश्मीरच्या खोर्‍यातली अनेक गावे डोंगराच्या उतारावर आहेत. त्यांना थोडा धोका कमी आहे. पण जम्मूचा सपाट प्रदेशाचा सुरुवातीचा भाग अधिक संकटात सापडला आहे. म्हणून जम्मूमध्ये विविध जलापघातांत मरणार्‍यांची संख्या ८९ तर काश्मीर खोर्‍यातल्या मृतांची संख्या ११ एवढी आहे. आतापर्यंत शंभरावर लोक मरण पावले आहेत. राज्यातली १,२२५ खेडी पूरग्रस्त झाली आहेत. परंतु निव्वळ पाण्याखाली बुडलेल्या गावांची संख्या जम्मूमध्ये जास्त आहे, तरीही काश्मीर खोर्‍यात ३९० गावे जलमय झाली असून अनेक गावांचा जगाशी असलेला संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे डोंगराचे कडे ढिले होतात आणि दरडी कोसळतात. भारताच्या अती उत्तरेत हिमाचल प्रदेश, उत्तरांचल आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये असे दरडी कोसळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात. त्याचाच अनुभव आता जम्मू-काश्मीरच्या जनतेला येत आहे. पुराबरोबर आणि गावे जलमय होण्याबरोबरच दरडी कोसळण्यानेही बरेच लोक मरत आहेत.

काश्मीर सारख्या भागामध्ये डोंगराळ भागात पुलाचे फार महत्व असते. कारण छोट्या-छोट्या नद्या, नाले यांनी भूप्रदेश विभागलेला असतो. अशा लोकांना परस्परांशी संपर्क साधण्यासाठी पूल हेच साधन असते आणि अशा अभूतपूर्व पर्जन्यवृष्टीने पूल कोसळतात. गावे जलमय झाली नाहीत तरी ती पूल कोसळल्यामुळे जगापासून तुटून राहतात. अशा लोकांना गावात आहेत त्या साधन सामग्रीवर तगून रहावे लागते. सतत पाऊस पडत असल्यामुळे हवाई मार्गानेही मदत मिळत नाही आणि अशा लोकांची उपासमार होते. सध्या काश्मीर खोर्‍यातल्या अनेक लोकांना पूल उद्ध्वस्त झाल्यामुळे हाल सहन करावे लागत आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला भरीव मदत दिली जाईल असे जाहीर केले आहे. पुरात मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदतही जाहीर केली आहे. ती पोचेल तेव्हा पोचेल, परंतु तूर्तास तिथल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवणे हे मोठेच आव्हान ठरलेले आहे. सरकारने त्यासाठी हेलिकाफ्टरचीही मदत घेतली जात आहे. काश्मीर मध्ये नेहमीच लष्कर तैनात असते. ते बंदोबस्तासाठी असते. पण आता हेच लष्कर लोकांना मदत करीत आहे. ही आपत्ती केवळ जम्मू काश्मीरवर आलेली नाही तर ती आपल्या देशावर आली आहे असे मानून सारा भारत देश जम्मू काश्मीरच्या मागे उभा आहे.

Leave a Comment