चीनमध्ये २० हजार जोडप्यांना दुसर्‍या मुलासाठी परवानगी

china
बिजिंग – एकच मूल पॉलिसी मागे घेण्यात आल्यानंतर चीनमध्ये सुमारे २० हजार जोडप्यांना दुसरे मूल जन्मास घालण्याची परवानगी दिली गेली असल्याचे वृत्त आहे. चीनमध्ये १९७० च्या दशकात लोकसंख्या वाढीचा वेग प्रचंड झाल्याने त्यावर नियंत्रणासाठी सरकारने एकच मूल पॉलिसी राबविली होती आणि त्याची अम्मलबजावणी अतिशय काटेखोरपणे करण्यात आली होती. मात्र त्यामुळे अलिकडच्या काळात देशात लहान मुले आणि तरूणांचे प्रमाण कमी झाले तर वृध्दांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली.

यामुळे देशाच्या उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम दिसू लागल्याने आणि भविष्यात युवकांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने एकच मूल पॉलिसी सध्या रद्द केली आहे. त्यानंतर बिजिंग म्युनिसिपल कमिशन ऑफ हेल्थ अॅन्ड फॅमिली प्लॅनिंगकडे दुसरे मूल हवे असणार्‍या पालकांकडून अर्ज मागविले गेले होते. त्यासाठी २१२४९ अर्ज आले पैकी १९३६३ अर्जांना मंजुरी दिली गेली. यात ३१ ते ३५ वयोगटातील महिलांचे प्रमाण ५६ टक्के आहे. ५३७ महिला चाळीशीच्या पुढच्या आहेत असेही समजते.