यंदाही येथे होणार गणपती मूर्तींच्या चोर्‍या

visarjan
जबलपूर – सोमवारी अनंत चतुर्दशीचा म्हणजे गणेशाला निरोप देऊन त्याचे विसर्जन करण्याचा दिवस. दहा दिवस चाललेल्या या सोहळ्याची सांगता गणेश मूर्तीचे जलाशयात विसर्जन करून केली जाते. शास्त्राप्रमाणे स्थापन केलेली मूर्ती विसर्जित करावी लागते आणि ती पाण्यातच करायची असते.

बुंदेलखंडात गणेश विसर्जनाच्या दिवशी अनोखी प्रथा पाळली जाते. लग्नोत्सुक तरूण तरूणी या दिवशी विसर्जनासाठी आलेल्या गणेश मूर्तींची नदी घाटावरून अथवा मंडपातूनच चोरी करतात. ही चोरी केलेली मूर्ती घरात नेऊन तिची पूजा अर्चा केली जाते आणि लग्न झाल्यानंतर तिचे विसर्जन केले जाते. बुंदेलखंडातील ही प्रथा आता देशाच्या अन्य भागातही पसरली आहे.

गणेश सिद्धीदाता आहे. रिद्धीसिद्धींचा हा स्वामी भक्ताची कोणतीच इच्छा अपुरी ठेवत नाही अशी भाविकांची अतूट श्रद्धा आहे. या भागात ज्यांचे विवाह ठरत नाहीत असे तरूण तरूणी विसर्जनापूर्वीच गणेश प्रतिमेची बेमालूम चोरी करतात आणि घरातील वडीलधारे त्यासाठी त्यांना प्रोत्साहितही करतात. घरात ही चोरीची मूर्ती नेली जाते आणि तिची पूजा अर्चा करताना आमचे लग्न होईपर्यंत विसर्जन करणार नाही असे गणेशाला भाविकतेने सांगितले जाते. विशेष म्हणजे पुढच्या गणेशचतुर्थीपर्यंत बहुतेकांचे विवाह जमतात असा अनुभव आहे.

पूर्वी ग्रामीण भागात ही प्रथा जास्त होती ती आता शहरी भागातही आली आहे. गणेश प्रतिमा चोरी करताना धडधड होते, कुणी पाहिल का अशी भीती मनात असते असे तरूण तरूणी सांगतात. मात्र तरीही हे धाडस केले जाते.विसर्जन ठिकाणी जमले नाही तर मंडपातून मूर्ती पळविण्याचा प्रयत्नही केला जातो.

Leave a Comment