मोटोरोलाने आणली मोटो जी, मोटो एक्सची नवी व्हर्जन

motorola
स्वस्त हँडसेटला भारतातून मिळालेल्या प्रचंड प्रतिसाद पाहून मोटोरोला मोबिलिटी कंपनीने मोटो जी व मोटो एकसची नवी व्हर्जन भारतात फ्लिपकार्टच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहेत. ही व्हर्जन पहिल्या व्हर्जनपेक्षा कमी किमतीतील आणि जादा फिचर्स देणारी असल्याचे मोटोरोला मोबिलिटी इंडियाचे प्रमुख अमित बोनी यांनी सांगितले.

बोनी म्हणाले की फ्लिपकार्टच्या सहकार्याने आम्ही भारतात फेब्रुवारीपासून मोटो जी, मोटो एक्स व मोटो ई ची १६ लाख युनिट विकली आहेत. आमच्या या तिनही स्मार्टफोनना भारतीय ग्राहकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. नवीन मोटो जी (१६ जीबी) १२९९९ रूपयांना मिळणार आहे. त्याची किंमत मागच्या व्हर्जनपेक्षा १ हजार रूपयांनी कमी आहे. नवीन मोटो ३६० स्मार्टवॉच सोबत मोटो एक्स या महिना अखेर उपलब्ध होणार आहे. त्यांच्या किमती नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.

आयडीसी नुसार भारतीय बाजारात २०१४ च्या दुसर्‍या तिमाहीत १.८४ कोटी स्मार्टफोन विकले गेले आहेत. त्यात २९ टक्के वाटा सॅमसंगचा आहे तर दुसर्‍या क्रमांकावर मायक्रोमॅक्स आहे. त्यांचा बाजारातील शेअर १८ टक्के आहे. मोटोरोलाने भारतीय बाजारात त्यांचा शेअर ५ टक्के असल्याचा दावा केला आहे.

Leave a Comment