महाराष्ट्र युती जागा वाटपांत अंतिम शब्द मोदींचा

modi (1)
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रथमच मुंबई भेटीवर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट व प्रीतीभोजन पार पडले असले तरी महायुतीच्या जागावाटपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. युतीच्या जागावाटपात अंतिम निर्णय शहा पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतरच घेतला जाईल असे खात्रीलायक वृत्त आहे.

भाजपने यंदा मिम्म्या निम्म्या जागांवर हक्क सांगितला आहे तर सेना मागच्याच फॉर्म्युल्यावर ठाम आहे.. भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये जागा वाटपावरून विविध मते आहेत, शिवसेनेला झुकावे लागेल असा अनेक वरीष्ठ नेत्यांना विश्वासही वाटतो आहे. मात्र मोदींशी अंतिम चर्चा केल्यानंतरच बोलणी पुढे सरकतील असे सांगितले जात आहे. या भेटीत नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे प्रभारी ओमप्रकाश माथुर हेही महत्त्वाची भूमिका निभावतील असे समजते.

उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर आल्यानंतर मोफत टॅब वाटप आणि ई प्रबोधन सीडी अशा घोषणा अगोदरच केल्यामुळे भाजप नाराज आहे.सेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी सुरू केली असा अर्थ त्यातून काढला जात आहे. त्यामुळे भाजपनेही आपली रणनिती तयार केली असून महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी खास समिती स्थापन केली आहे. या समितीत निवडणुका जिंकण्याची जबाबदारी प्रामुख्याने अमित शहा यांच्यावर टाकली गेली आहे. त्यांना या कामी दीर्घ अनुभव असलेले नितीन गडकरी, साथ देणार आहेत. त्यांच्यावर निवडणूक प्रचाराची जबाबदारी आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव प्रताप रूडी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचीही या समितीत वर्णी लागली आहे. तसेच कोकण विकासावर प्रभाव असलेले विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्यावर कोकण विभागाची, मराठवाडा विभागाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर दिली गेली आहे. त्यांच्या संघर्ष यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांना प्रचाराचा प्रमुख चेहरा म्हणून काम करावे लागणार आहे. विदर्भात प्रभाव असलेले सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विदर्भाची तर खानदेशात भाजप वाढविण्यात सहभाग असलेले एकनाथ खडसे यांच्यावर खानदेशाची जबाबदारी दिली गेली आहे.

Leave a Comment