बिसलेरी चे आता उर्जा ड्रिंक

bisleri
देशात पिण्याचे बाटलीबंद पाणी विक्री करणारी बडी कंपनी बिसलेरी इंटरनॅशनल आता ऊर्जा नावाचे एनर्जी ड्रिंक घेऊन भारतीय बाजारात उतरली आहे. उत्तम चवीचे आणि दमल्या भागल्या शरीर व मनाला नवीन उर्जा देणारे हे पेय असल्याचा कंपनीचा दावा आहे.एक वर्षाच्या कालावधीत कंपनीने १ कोटी युनिट विक्री करण्याचे ध्येय ठरविले आहे. हे पेय २५० व ३०० मिलीच्या बाटल्यांतून उपलब्ध करून दिले गेले आहे आणि त्याची किंमत आहे ५० रूपये.

या संदर्भात अधिक माहिती देताना बिसलेरी इंडियाचे अध्यक्ष रमेश चौहान म्हणाले की आम्ही नव्याने बाजारात आणलेले हे ड्रिंक कोणत्याही वेळी, कुठेही व कधीही पिण्यासारखे आहेच पण सर्व वयोगटांसाठी ते आदर्श आहे. सध्या हे पेय कांही ठराविक भागातच उपलब्ध असले तरी या महिनाअखेर ते देशभरात मिळू लागेल. एनर्जी देणारे हे पेय दोन वर्षांच्या संशोधनातून तयार केले गेले आहे. देशात त्याचे ७ ठिकाणी उत्पादन केले जाणार आहे. पैकी पाच प्रकल्प कंपनीचे आहेत. बिसलेरीच्या सध्याच्या वितरण व्यवस्थेतूनच ते वितरित केले जाणार आहे. कंपनीने त्यासाठी २०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे.

बिसलेरी देशात सध्या विकल्या जात असलेल्या बाटलीबंद पाण्याच्या विक्रीत आघाडीवर असून बाजारातील त्यांचा हिस्सा ६० टक्के आहे.कंपनीची देशात ५ लाख आऊटलेट आहेत. शिवाय कंपनी बिसलेरी सोडा आणि वेदिका या पेयांची विक्रीही करते आहे.

Leave a Comment