आशिया खंडातील सर्वात मोठे विद्यापीठ पुण्यात

eyegate
पुणे – आयगेट कंपनीचे मुख्याधिकारी अशोक वेमुरी यांनी आशियातील सर्वात मोठे आयगेट कॉर्पोरेट विद्यापीठ हिंजेवाडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या फेज तीनमध्ये ४२० कोटी रुपये गुंतवून उभारण्यात आल्याची घोषणा येथे पत्रकार परिषदेत केली. कॉर्पोरेट विद्यापीठासोबत पाच हजार जणांना तीन टप्प्यात रोजगार देणारे सॉफ्टवेअर विकास केंद्र त्याच संकुलात सुरू केले जाणार आहे. या पहिल्या कॉर्पोरेट विद्यापीठात जगभरातील अनुभवी आणि नामवंत व्यक्ती येथे प्राध्यापक म्हणून काम करणार आहेत.

न्यूजर्सीस्थित आयगेट ही कंपनी असून तिची उलाढाल १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक असून ३४ हजार कर्मचारी जगभर आहेत. या सर्व कर्मचार्‍यांना विद्यापीठात प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे नमूद करून वेमुरी म्हणाले की, पहिल्या टप्प्यात आम्ही बिट्स पिलानी, एक्सएलआरआय आणि सिम्बॉयोसिस या संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. रिओ टींटो या खाण आणि धातू क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपनीला लागणारे कुशल मनुष्यबळ विद्यापीठात तयार होणार आहे. आगामी काळात देशातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीशी (आयआयटी) सहकार्य केले जाणार आहे. अल्प आणि दीर्घकालीन असे २०६ अभ्यासक्रम या विद्यापीठात शिकवले जाणार असून अभियांत्रिकी क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होईल.