बळीराजाची मराठवाड्यात क्रूर थट्टा, दिला अवघ्या ३७ रुपयांचा चेक

shetkari
औरंगाबाद – गारपीट ग्रस्तांना सरकारकडून तोकडी मदत करण्यात आली आहे. एका शेतकऱ्याला सरकारने मदत म्हणून ३७ रुपयांचा धनादेश दिला आहे.

गारपीटग्रस्तांना मदत देऊन उभारी देण्याऐवजी सरकारने तोकडी मदत देऊन त्यांची थट्टा केली आहे. मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीत नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांना सरकरने नुकसान भरपाई दिली आहे. मात्र, ही मदत म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला या म्हणीसारखी आहे.

सिल्लोड तालुक्यातील प्रभाकर बावस्कर या शेतकऱ्याला त्यांच्या दहा कोंबड्या मेल्याच्या मोबदल्यात मदत म्हणून त्यांना ३७ रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. गारपिटीमध्ये या शेतकऱ्याच्या दहा कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या.

या शेतकऱ्याला सिल्लोड येथील हैदराबाद बँकेच्या खात्याचा ३७ रुपयाचा चेक देण्यात आला आहे. बावस्कर यांच्या दहा कोंबड्या दगावल्या. त्याचा पंचनामा करण्यात आला होता. या कोंबड्याचा मोबदला मिळण्याची आशा शेतकऱ्याला होती, परंतु सरकारने मोबदला दिला फक्त ३७ रुपये.

३७ रुपयांचा हा धनादेश घेण्यासाठी आणि वटविण्यासाठी त्याच्या तीन पट खर्च येणार आहे. त्यामुळे सरकारची मदत म्हणजे भीक नको पण, कुत्र आवर अशीच म्हणावी लागेल. शेतकऱ्यांना तोकडी मदत देत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत आहे.

Leave a Comment