जनसंपर्क सल्लागार

public-relation
कसलीही गुंतवणूक न करता करता येणारा हा एक उत्तम व्यवसाय आहे. सध्याच्या काळामध्ये जनसंपर्क हा शब्द परवलीचा झाला आहे. कारण नेते, अभिनेते, उद्योगपती, विविध संस्था, संघटना, व्यावसायिक या सर्वांनाच जनसंपर्काची गरज जाणवायला लागली आहे. यातल्या कोणाचाही व्यवसाय किंवा कार्य हे जनतेमध्ये निर्माण होत असते. समाजाच्या विविध घटकांच्या पाठींब्यातून आणि सहकार्यातून त्यांच्या कार्याला गती मिळत असते. समाजाच्या अंगाखांद्यावरच त्यांचे व्यवसाय निर्माण होत असतात आणि वाढत असतात. त्यांचा व्यवसाय वाढणे हे समाजात त्यांची प्रतिमा कशी आहे यावर अवलंबून असते. ती चांगली नसेल तर समाजाचा पाठींबा त्यांना मिळत नाही. म्हणून विविध संस्था, संघटना आणि यंत्रणा जनता संपर्कासाठी आसुसलेल्या असतात. त्यासाठी त्यांचे प्रयत्न जारी असतात. परंतु आपली प्रतिमा समाजात चांगली निर्माण करणे हे काही सोपे काम नाही. त्यासाठी अनेक उपाय योजावे लागतात आणि विविध माध्यमांशी संपर्क ठेवून त्यातून आपली प्रतिमा समाजासमोर आणावी लागते. हे पूर्णवेळचे काम आहे आणि त्यासाठी मोठ्या यंत्रणांत आणि संघटनांत पूर्णवेळ जनसंपर्क अधिकारी नेमलेला असतो. त्याच्या हाताखाली मोठी यंत्रणा असते.

राज्य सरकार, केंद्र सरकार, महापालिकेसारख्या निम शासकीय संस्था किंवा वीज मंडळ, परिवहन महामंडळ अशा यंत्रणांचा कारभार फार मोठा असतो. त्यांच्या कामाची आणि त्यांना ज्यांच्याशी संपर्क साधायचा आहे अशा लोकांची व्याप्तीही मोठी असते. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ जनसंपर्क अधिकारी नेमणे आणि त्यांच्या हाताखाली काही कर्मचार्‍यांची यंत्रणा निर्माण करणे हे परवडते. परंतु अनेक छोटे-मोठे उद्योग, शिक्षण संस्था किंवा फार मोठा आर्थिक खर्च न करणार्‍या स्वयंसेवी संघटना, रुग्णालये यांना पूर्ण वेळचा जनसंपर्क अधिकारी नेमणे परवडत नाही. अशा लोकांना जनसंपर्क कामाचा सल्ला देणे आणि त्यांना गरज पडेल तशी जनसंपर्काची सेवा प्रदान करणे हा व्यवसाय उपयुक्त ठरू शकतो. काही मोठ्या संस्था आणि यंत्रणांमध्ये पूर्णवेळ काम करणारी स्वत:ची कायद्याची यंत्रणा असते. एखादा वकील किंवा कायद्याची माहिती असणारा जाणकार त्या यंत्रणेचा प्रमुख असतो. परंतु लहान-मोठ्या संस्थांना नेहमीच काही कायदेशीर कामांना तोंड द्यावे लागत नाही. अधूनमधून कधी तरीच कोर्टाची पायरी चढावी लागते. तेव्हा अशा संस्था एखाद्या वकिलाची कायदा सल्लागार म्हणून नेमणूक करतात. तो वकील त्या संस्थेचा कर्मचारी नसतो, मात्र संस्थेला गरज पडेल तेव्हा काही ठराविक मानधन घेऊन तो त्या संस्थेला कायदा सल्ला देत असतो.

त्याच धर्तीवर हा जनसंपर्क सल्लागार काही मानधनावर विविध संस्थांचा अत्यल्प वेळचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करू शकतो. संस्थेच्या बातम्या विविध माध्यमांतून छापून आणणे हे त्याचे एक मुख्य काम असते. अर्थात केवळ बातम्या छापल्याने प्रतिमा निर्माण होतेच असे नाही. जनसंपर्कासाठी अनेक उपक्रमही हाती घेता येतात. अशा उपक्रमांमध्ये काही सेवाभावी कामे असतात. काही वेळा एखादा उपक्रम राबवावा लागतो आणि त्या माध्यमातून संस्थेची प्रतिमा समाजात चांगली होत असते. सध्या उद्योग विश्‍वामध्ये सीएसआर ही संकल्पना फार लोकप्रिय ठरली आहे. उद्योग विश्‍वात काम करणार्‍या कारखान्यांनी आणि सेवा उद्योगांनी आपल्या नफ्याचा काही हिस्सा सामाजिक कार्यावर खर्च केला पाहिजे असा दंडक आहे. त्यालाच सीएसआर किंवा कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी असे म्हटले जाते. अशा संस्थांना समाजासाठी खर्च तर करावा लागतो, परंतु तो खर्च योग्य पद्धतीने होतो की नाही आणि त्यातून संस्थेची प्रतिमा चांगली निर्माण होते की नाही यावर लक्ष ठेवावे लागते. तसे लक्ष ठेवणारी यंत्रणा नसल्यास कोणी तरी भामटे किंवा लोकांची फसवणूक करणारे कार्यकर्ते संस्थेने सीएसआर साठी म्हणून राखून ठेवलेले पैसे घेऊन जातात.

संस्थेचा पैसा तर खर्च होतो, पण तो योग्य पद्धतीने खर्च होत नसल्यामुळे पैसा देण्यामागचा हेतू सफल होत नाही. खर्च तर करावा लागणारच असेल तर तो सत्कारणी होईल यावर लक्ष ठेवण्याचे काम त्या संस्थेचा जनसंपर्क सल्लागार करू शकतो. अशा सल्लागाराला त्याच्या कष्टाबद्दल काही पैसे द्यावे लागले तरी संस्थेचे काही नुकसान होत नाही. जनसंपर्क सल्लागाराला इतरही अनेक कामे करता येतात. संस्थेला पत्रकारांची भेट घडवणे, संस्थेचे व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात सुसंवाद निर्माण करणे, जनता आणि संस्था यांच्यात संवाद घडवणे, संस्थेच्या नियतकालिकाचे संपादन करणे, स्मरणिकेसारख्या कधी तरी निघणार्‍या प्रकाशनांचे संपादन करणे, प्रसिद्धी आणि प्रचारासाठी आवश्यक असलेले साहित्य निर्माण करणे, विविध प्रदर्शनांमध्ये आणि यात्रांमध्ये संस्थेचा स्टॉल उघडणे, अशा सर्व उपक्रमांना योग्य ती प्रसिद्धी मिळवून देणे हीही कामे जनसंपर्क सल्लागार करू शकतो. मात्र हा व्यवसाय करणार्‍या व्यक्तीला जनसंपर्काची हातोटी माहीत असण्याची गरज आहे. शिवाय त्याचा माध्यमांशी फार निकटचा संबंध असला पाहिजे आणि माध्यमात काम करणार्‍या पत्रकारांशी जिव्हाळ्याचा संबंध असला पाहिजे. संबंध, संपर्क आणि लिखाणाची शैली हेच त्याचे भांडवल असते.

Leave a Comment