अखेर शहा – ठाकरे भेट घडली

amitshah
मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अखेर काल रात्री साडेदहाच्या सुमारास मातोश्रीवर जाऊन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. या भेटीत जागावाटपावर कोणतीही बोलणी झाली नसल्याचे समजते. मात्र महायुती एकत्रच आगामी निवडणुका लढविणार यावर शिक्कामोर्तब केले गेल्याचेही सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आठ प्रचार सभा घेणार आहेत असेही समजते.

लोकसभा निवडणुकांनंतर मुंबई भेटीवर प्रथमच आलेले भाजप राष्टीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव यांची भेट घ्यायची नाही असा निर्णय घेतला होता. मात्र राज्यातील भाजप नेत्यांनी त्याचा फटका विधानसभा निवडणुकांत बसेल अशी भीती त्यांच्याजवळ व्यक्त केली होती तसेच आपण निमंत्रण दिल्याशिवाय शहा भेटणार नाहीत आणि भेट झाली नाही तर जागावाटपाबाबत बोलणी होणार नाहीत याची कल्पना उद्धव ठाकरे यांना त्यांच्या सल्लागांरांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून शहांना भेटीचे निमंत्रण दिले होते.

या भेटीत जागावाटपाबाबत बोलणी झाली नसली तरी येत्या ४-५ दिवसांत जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे असे समजते. युतीचा निवडणुक प्रचार एकत्रच केला जाणार आहे. तसेच उद्धव ठाकरे व युतीतील अन्य प्रमुख पक्ष नेत्यांसोबत स्वतः अमित शहा संयुक्त प्रचार सभा घेणार आहेत. अमित शहा यांनी महाराष्ट्रावर पूर्ण लक्ष केंद्रीत केले असल्याचेही सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्यासोबत राज्याचे निवडणूक प्रभारी ओमप्रकाश माथूर, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार हेही उपस्थित होते.

Leave a Comment