सत्तेवर आल्यास विद्यार्थ्यांना मोफत टॅब – उद्धव ठाकरे

udhav
मुंबई: राज ठाकरे यांच्या विकासाच्या ब्लू प्रिंटला मुहूर्त सापडला असतानाच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेच्या व्हिजन डॉक्यूमेंटचा पुढचा टप्पा मांडून पुन्हा एकदा मनसेवर मात केली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटमधील आणखी एक टप्पा जाहीर केला. या टप्प्यात त्यांनी महायुती सत्तेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोफत टॅब देणार असल्याचे जाहीर केले.

उद्धव ठाकरे व्हिजन डॉक्युमेंटमधील शिक्षणाच्या टप्प्याबाबत बोलताना म्हणाले, ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबसोबतच १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम असलेले एसडी मेमरी कार्डही देणार असल्याचे सांगितले. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या प्रतिक्षेत राहण्याची गरज राहणार नाही.

उद्धव ठाकरे यांनी यासोबतच ग्रामीण भागातील वीजेचा प्रश्न लक्षात घेता विद्यार्थ्यांना सोलर चार्जरही देणार असून याबरोबरच विद्यार्थ्यांना क्रांतीकारकांची माहिती असणारी ‘वंदे मातरम्’ नामक पुस्तिकाही भेट देणार असल्याचे सांगितले.

udhav1

या सर्व शिक्षणाच्या योजनेला ई-प्रबोधन असे नाव असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. ई-क्लासद्वारे मुलांना शिक्षण देण्यासाठी एक विशेष किटही देण्यात येणार आहे. या किटमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम असलेला पेन ड्राईव्ह, एक टेलिव्हिजन सेटचा समावेश असणार आहे. गरिबीमुळे शिक्षण न घेऊ शकणाऱ्या मुलांसाठीही विशेष प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

केवळ योजना जाहीर करण्यात महाराष्ट्र पुढे ठेवणार नसून सत्तेत आल्यानंतर सर्व योजना अंमलात आणणार असल्याचा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला. तसेच व्हिजन ड़ॉक्युमेंटमधील शिक्षणाच्या टप्प्यानंतर पुढचा टप्पा दोन दिवसांनी जाहीर कऱणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मात्र या सर्व योजना शिवसेनेच्यावतीनं जाहीर करण्यात आल्या आहेत. महायुतीच्या याबाबत मित्रपक्षांचं मत काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Leave a Comment