अल कायदाची शाखा भारतीय उपमहाद्विपात सुरू

alq
अल कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा प्रमुख अयमन अल जवाहिरी याने भारतीय उपमहाद्विपात कायदात अल जिहाद या नावाने अल कायदाची शाखा सुरू करण्यात आल्याचे एका व्हिडीओच्या माध्यामातून जाहीर केले आहे. या नव्या शाखेचे नेतृत्व पाकिस्तानी आसिफ उमरकडे सोपविले गेले असल्याचेही जवाहिरीने जाहीर केले आहे.

या संदर्भातला ५० मिनिटांचा एक व्हिडीओ अल कायदाने प्रसिद्ध केला आहे. त्यात जवाहिरीने मुस्लीम लोकांची वाटणी करण्यासाठी ज्या बनावट सीमा तयार केल्या आहेत त्या नष्ट केल्या जाणार असल्याचे सांगतानाच या नव्या शाखेमुळे बांग्ला देश, म्यानमार, भारतातील आसाम, गुजराथ व जम्मू काश्मीरमध्ये अन्याय होत असलेल्या मुस्लीमांची या अन्यायापासून सुटका होणार असल्याचे आश्वासन दिले आहे. नव्या शाखेची स्थापना या मुस्लीमांसाठी चांगली बातमी ठरेल असेही जवाहिरीचे म्हणणे आहे. गेली दोन वर्षे मुजाहिद्दीनींना एकत्र आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू होते व त्यातूनच या नव्या शाखेचा जन्म झाल्याचेही जवाहिरी सांगतो.

इस्लाम दहशतवाद विषयातील जाणकारांच्या मते मात्र इस्लामिक स्टेटचे महत्त्व कमी करण्याच्या अल कायदाचा प्रयत्न असून त्यातूनच ही नवी शाखा उदयास आली आहे. इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांनी अल कायदाला जगभर आव्हान उभे केले आहे आणि या संघटनेकडे जगभरातील अनेक देशातील युवक मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. ही संघटना आपल्या मुळावर येईल अशी भीती अल कायदाला वाटते आहे आणि त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. २०११ मध्ये ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर अल कायदाचे म्होरकेपण जवाहिरीकडे आले आहे.

Leave a Comment