अमित शहांनी स्वीकारले उद्धव ठाकरेंचे आमंत्रण

amit-shah1
मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेले भेटीचे आमंत्रण स्वीकारले असून आज रात्री साडे नऊ वाजता मातोश्रीवर अमित शहा उद्धव यांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली.

षण्मुखानंद सभागृहातील कार्यकर्ता संमेलन पार पडल्यानंतर अमित शहा शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीस्थळाची भेट घेतील. त्यानंतर शहा गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. तिथून परतल्यानंतर रात्री साडेनऊ वाजता उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

अमित शहांना अब महाराष्ट्र, सब महाराष्ट्र या जाहिरातीमुळे शिवसेनेने पोस्टरबाजी करत कानपिचक्या दिल्यामुळे मुंबईच्या दौऱ्यावर असणारे अमित शहा उद्धव ठाकरेंची भेट घेणार की नाही याबाबत चर्चा रंगली होती. अखेर उद्धव ठाकरेंनी शहांना मातोश्रीवर येण्याचे आमंत्रण दिल्यानंतर त्यांनीही ते स्वीकारले आहे.

दरम्यान, अमित शहांचे मुंबई विमानतळावर दणक्यात स्वागत करण्यात आले. मुंबईत विमानतळाच्या सायलेन्स झोनमध्येही भाजपचे ढोल-ताशे वाजवण्यात आले.

Leave a Comment