शिवसेना नेत्यांना भेटणार नाही अमित शहा

amit-shah
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ४ सप्टेंबरला मुंबईत येणार असून यावेळी ते शिवसेना नेत्यांना भेटणार नसल्यामुळे युतीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या आधीच शिवसेना भाजप युतीमध्ये जागावाटपावरून बेबनाव सुरु आहे.

आजवर एकमेकांसोबत शिवसेना भाजपने अनेक निवडणुका एकत्र लढवल्या असून या निवडणुकांआधी शिवसेना भाजपात मतभेदही निर्माण झाले. मात्र हे मतभेद टोकाला जाण्याआधीच दोन्ही नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेउन ते वेळीच मिटवले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले त्या जोरावर विधानसभा निवडणुकीत निम्म्या जागांची मागणी भाजपचे नेते करत आहेत. जिथे संधी मिळेल तेथे सेनेला दाबण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होतो आहे. या पार्श्वभूमीवपर शिवसेनेनेही विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच २८८ मतदारसंघात लढण्याची तयारी ठेवली आहे. त्याकरिता शिवसेनेने राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ५ सप्टेंबरला ठेवली आहे.

उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे नेते भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे प्रचंड दुखावले असून ४ सप्टेंबरला निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत येणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेनेच्या नेत्यांना भेटणार नाहीत. या सगळ्या घ़डामो़डींमुळे शिवसेना भाजपातील संबंध कधी नव्हे एवढे बिघडत चालले आहेत. याचे पर्यवसान स्वबळावर निवडणूक लढवण्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान भाजपनं केलेल्या सर्व्हेत भाजपला स्वबळावर सत्ता मिळेल असा निष्कर्ष असून निम्म्या जागा दिल्या तर ठीक, नाहीतर स्वबळावर लढण्याची तयारी भाजपनं ठेवलेली आहे.

Leave a Comment