रशियातील मिरा हिरे खाण - Majha Paper

रशियातील मिरा हिरे खाण

रशियाच्या पूर्व सायबेरियातील मिरा हिरे खाण ही बिंघम कॅनियन नंतरची जगातील दोन नंबरची खोल खणलेली खाण म्हणून प्रसिद्ध आहे. २००४ साली सुरक्षेच्या कारणावरून बंद केली गेली असली तरी सुरवातीला जेव्हा ही खाण खोदली गेली तेव्हा तिच्यामधून दरवर्षी २००० किलो वजनाचे हिरे काढले जात असत असे आकडेवारी सांगते.

या खाणीविषयी असे सांगितले जाते की ५२५ मीटर खोल आणि १२०० मीटर रूंदीची ही खाण म्हणजे प्रचंड मोठे विवर आहे. हा खड्डा इतका प्रचंड मोठा आहे की अनेकवेळा या खाणीवरून उडणारी हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाली. तज्ञांनी त्यामागचे कारण शोधले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की या खाणीच्या प्रचंड विवरातून वाहणार्‍या हवेमुळे हेलिकॉप्टर आत खेचली जातात आणि अपघात घडतात. तेव्हापासून ही खाण सुरक्षेस्तव बंद केली गेली आहे.

या खाणीचा शोध १९५५ साली भूवैज्ञानिक युरी खैबरदान यांनी लावला व त्याबद्दल त्यांना सर्वोच्च समजला जाणारा लेनिन पुरस्कारही दिला गेला. रशियातील अशा प्रकारची ही पहिलीच हिरे खाण आहे. या भागात सात महिने प्रचंड थंडी असते व त्यामुळे जमीन कडक बनते. परिणामी जेट इंजिन आणि डायनामाईट वापरून खाणीचे खोदकाम करावे लागत असे. ४४ वर्षे सतत या खाणीतून हिरे काढले गेले. आता मात्र ही खाण बंद केली गेली आहे.

Leave a Comment