लोकपाल नेमा – अण्णांचे मोदींना पत्र

anna
पुणे – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिलेवहिले पत्र लिहिले असून त्यात देशात लोकायुक्त व लोकपाल नेमले जावेत अशी मागणी केली आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल मोदींचे अभिनंदनही अण्णांनी याच पत्रातून केले आहे.

अण्णा लिहितात, २८ ऑगस्टला जनलोकपाल साठीच्या आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या पत्रातून मी आपल्याला आठवण करून देतो की जनलोकपाल संबंधी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी एक समिती नेमली होती आणि त्यावेळी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने विधेयकाचे समर्थन केले होते. हे विधेयक २०१३ साली मंजूर झाले. भ्रष्टाचार संपविण्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त यांच्या नेमणुका होणे हे अत्यंत आवश्यक आहे.

आपण आपल्या १५ ऑगस्टच्या भाषणात देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आपण देशात लोकपाल व राज्यांसाठी लोकायुक्तांच्या नेमणुका करण्यासंबंधी पावले उचलावीत तसेच अन्य कांही विधेयकात जरूरीच्या असलेल्या सुधारणा करून तीही मंजूर करावीत अशी विनंती आहे. जमीन अधिग्रहण विधेयकातही सुधारणा आवश्यक आहे. कस्तुरीरंगन समिती शिफारसींकडे दुर्लक्ष झाल्यानेच लवासा सारखे पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प उभे राहात आहेत याचीही नोंद घेतली जावी.

Leave a Comment