पाळणाघर

baby-seating
महिलांना घरात बसल्या बसल्या करता येणारा आणि कसलेही भांडवल न गुंतवता होणारा साधा, सोपा व्यवसाय म्हणजे पाळणाघर. पाळणाघराचा व्यवसाय करणार्‍या अनेक महिला मोठ्या शहरात आहेत आणि त्या घराच्या बाहेर सुद्धा न पडता चार पैसे कमावून संसाराला उत्तम हातभार लावत आहेत. पाळणाघरामध्ये लहान मुले सांभाळली जातात आणि ज्या महिलांना लहान मुलांची आवड असते त्यांना पाळणाघर हा व्यवसाय व्यवसाय न होता छंद होऊन जातो. काही महिला घरात एकट्याच असतात, त्यांचाही एकटेपणाचा वेळ कारणी लागतो आणि चार पैसेही मिळतात. सध्या आपल्या समाजामध्ये महिलांचे शिक्षण वाढले आहे आणि त्या नोकर्‍या करायला लागल्या आहेत. अशा महिलांना मुले झाली की, त्यांना कोणी सांभाळावे हा प्रश्‍न पुढे येतो. सासू-सासर्‍यांनी मुले सांभाळावीत हे साहजिक आहे. परंतु या संबंधात सुद्धा आता अडचणी यायला लागल्या आहेत. ज्यांच्या कुटुंबामध्ये अशा वृद्ध व्यक्ती नाहीत त्यांनी काय करावे? काहींच्या घरात आजोबा-आजी आहेत, परंतु सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजोबा-आजी आपल्या मूळ गावी रहात आहेत आणि मुले नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरात जातात. अशा वेळी त्या आजोबा-आजींचा मुले सांभाळण्यास उपयोग होत नाही.

काही कुटुंबात आजोबा-आजी आहेत, परंतु त्यांच्यामध्ये लहान मुलांना सांभाळण्याची क्षमता नाही. त्यांच्या स्वत:च्याच प्रकृतीच्या चिंता त्यांना लागलेल्या असतात. त्यामुळे काही वृद्ध लोकांना मुले सांभाळण्याची दगदग सहन होत नाही. ज्यांच्या घरात आजोबा-आजी नाहीत त्यांना तर मुले पाळणाघरात सोडावी लागतातच. पण काही घरात आजोबा-आजी असतानाही मुले पाळणाघरात सोडावी लागतात. मुलांची आणि सुनेची नोकरी हे पाळणाघराचे मूळ कारण आहे. परंतु काही कुटुंबांमध्ये आजोबा-आजींचे सुद्धा करिअर सुरू असते. तेव्हा अशा कुटुंबात तर आजोबा-आजी असूनही आणि ते सक्षम असूनही मुलांना पाळणाघरात सोडणे भाग पडते. एकंदरीत सध्याच्या जीवन पद्धतीमध्ये मध्यम वर्गीय वस्त्यांत पाळणाघर ही एक गरज होऊन बसली आहे. काही ठिकाणी तर मुले असणारी दांपत्यांपैकी महिला ही गृहिणी असते. ती काही नोकरी करत नाही, घरीच असते. पण तिच्या घरच्या कामात एवढा वेळ जातो की, आपले लहान मूल दिवसातून दोन-तीन तास कोणी सांभाळले तर बरे, असे तिला वाटत राहते. घरकामात पूर्ण लक्ष द्यायला तिला एक-दोन तास मोकळे मिळावेसे वाटतात. किंवा काही वेळेला विश्रांती सुद्धा हवी असते. अशा सुद्धा महिला पाळणाघराचा आधार घेतात.

ज्या महिलांना काही तरी करून संसाराला हातभार लावायचा आहे, घरातून मिळणारा मोकळा वेळ सत्कारणी लावून पैसा कमवायचा असेल अशा महिलांना ही एक उत्तम संधी आहे. काही कुटुंबांमधून महिलांना पैसा कमवावा वाटतो आणि त्या मार्गाने राहणीमान वाढवावे अशी इच्छा होते. पण पुरेसे शिक्षण झालेले नसते आणि बाहेर पडून फार चांगली नोकरी मिळवून पुरेसा पगार मिळेल अशीही शाश्‍वती वाटत नाही अशा अल्पशिक्षित महिलांसाठी तर ही उत्तम संधी आहे. अन्यथा धड दहावीही पास न झालेल्या महिलांना चांगली नोकरी मिळत नाही आणि फार कमाईही होत नाही. अशा महिलांनी घरात बसून दोन-तीन मुले सांभाळली तरी तिला इतके उत्पन्न होऊ शकते की, तिला तेवढे उत्पन्न घराबाहेर पडून नोकरी करून कधीच मिळणे शक्य नाही. तेव्हा अल्पशिक्षित महिलांसाठी पाळणाघर तर एक वरदानच आहे. काही महिलांच्या नवर्‍यांना आपल्या पत्नीने चार पैसे कमावावेत असे वाटते, परंतु घरात बसून कमावावेत अशी त्यांची कल्पना असते. काही लोकांच्या नोकर्‍या मोठ्या दगदगीच्या असतात. तेव्हा पत्नीने घरकाम नीट सांभाळले तर त्यांना नोकरीतली दगदग सुसह्य होते. त्यामुळे असे लोक आपल्या बायकोला पैसे कमविण्यास प्रोत्साहन देतात पण जे काही करायचे ते घरात बसून करावे आणि संसाराकडे दुर्लक्ष न होता करावे अशी अट घालतात.

कित्येक पुरुषांना आपली बायको घराबाहेर पडलेलीच आवडत नाही. अशा महिलांना पाळणाघर हा व्यवसाय फार उत्तम ठरणारा आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीच करावे लागत नाही. घराच्या दारावर पाळणाघर असे लिहून ठेवले तरी ज्यांना गरज असते ते लोक आपोआपच संपर्क साधतात. त्यातून व्यवसाय सुरू होतो आणि माऊथ टू माऊथ पब्लिसिटी होऊन आपोआपच नवीन नवीन मुले मिळायला लागतात. व्यवसाय वाढत जातो. या व्यवसायामध्ये फार दगदगही नाही. लहान मुले असतात, त्यांचे शी-शू यांची काळजी घ्यावी लागते. त्यांना वेळेवर दूध पाजावे लागते आणि बहुतेक वेळ तर ती मुले झोपलेलीच असतात आणि या कामात थोडी दगदग असली तरी हौस असल्यास ती दगदग वाटत नाही. उलट छान वाटते. काही पाळणाघरात तर महिला इतक्या मन:पूर्वक व्यवसाय करतात की, मुलांना स्वत:च्या जन्मदात्या आईएवढाच पाळणाघरातल्या आजीचा सुद्धा लळा लागतो. याबद्दल मिळणारा मोबदला हा शहरानुसार निरनिराळा असतो. पुण्या-मुंबईत तर पाळणाघराचा दर मुलामागे महिन्याला चार ते पाच हजार रुपयांपर्यंत गेलेला आहे. तेव्हा उत्पन्नही चांगले मिळू शकते.

Leave a Comment