तरंगते बाजार – शॉपिंगची अनोखी तर्‍हा

floating
माणूस आणि शॉपिंग यांचे नाते अतूट आहे. त्यातही महिला वर्गासाठी शॉपिंग हा जीवनमरणाचा प्रश्न असतो असाही एक समज आहे. माणूस जगात जितक्या विविध पद्धतींनी जगतो, तितक्याच विविध पद्धतींनी शॉपिंग म्हणजे खरेदीही करत असतो. आता साधी दुकाने, मॉल, ऑनलाईन शॉपिंग अशी विविध माध्यमे खरेदीसाठी उपलब्ध झाली आहेत. मात्र तरंगते बाजार शॉपिंगची एक आगळीच मजा देतात.

जगातील अनेक देशांत असे तरंगते बाजार आहेत. मात्र त्यात सर्वाधिक प्रसिद्ध आहेत ते थायलंडचे बाजार. राजधानी बँकॉग येथील तरंगते बाजार खरेदीदारांची तसेच पर्यटकांची खास आकर्षणे आहेत. येथे खरेदी करणारे आणि माल विकणारे असे दोघेही नावातून तरंगत असतात. अगदी गल्ली बोळातून या नावा आपला मार्ग काढतात. या बाजारातही गर्दी खूप असते, नावांची वाहतूक कोंडी होते आणि अगदी ,मच्छी बाजारासारखा गलकाही येथे पाहायला ऐकायला मिळतो.

या तरंगत्या दुकानातून काय मिळत नाही? भाजीपाला, फळे, विविध प्रकारची सुंदर फुले, कपडे, सौदर्यप्रसाधने, खाण्याचे विविध प्रकार, चटकमटक स्नॅक्स, शोभेच्या वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू, किराणा माल अगदी म्हणाल ते सारे येथे हजर असते. आपलाच माल विकला जावा म्हणून विक्रेत्यांची स्पर्धाही होते. थायलंडमधील रॅचबरी हे फलोटिंग मार्केट म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. मग्लांग नदीला जोडणारा हा कालवाच आहे.

भारतातही श्रीनगरच्या दल सरोवरात असे तरंगते बाजार आहेत. येथे दल सरोवराची सफर करणार्‍या पर्यटकांसाठी केशर, काश्मीरी कलाकुसरीचे कापड, सुंदर कोरीव लाकडी वस्तू, भेट वस्तू विकण्यासाठी शिकार्‍यातून हा व्यापार केला जातो. येथे अगदी मौल्यवान खडे आणि चांदीचे सुंदर दागिनेही याच प्रकारे विकले जातात. बँकॉगचा टेलिग चान हा तरंगता बाजार खास सीफूड साठी प्रसिद्ध आहे. येथे फ्लोटिंग रेस्टॉरंटही आहे आणि तेथे जाण्यासाठी छोट्या नावांचा वापर करूनच खवैय्यांना जावे लागते.

Leave a Comment