किमान मासिक पेन्शन सप्टेंबरपासून लागू

epfo

नवी दिल्ली- बहुप्रतीक्षित १००० रुपये किमान मासिक पेन्शन सप्टेंबरपासून लागू होणार आहे. याचा २८ लाख पेन्शनधारकांना ताबडतोब फायदा मिळून ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्षात ही रक्कम त्यांच्या हातात पडेल. याबरोबरच कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या ईपीएफ योजनेसाठीची मूळ वेतनमर्यादा १५,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

कर्मचारी पेन्शन योजना १९९५ (ईपीएफएस ९५)अंतर्गत सरकारने १००० रुपये किमान मासिक पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच ईपीएफचा फायदा अधिक व्यापक करण्यासाठी मासिक वेतनमर्यादा १५,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे संघटित क्षेत्रातून ५० लाख नवे सदस्य ईपीएफओशी जोडले जाणार आहेत.

याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या ठेवींशी संबंधित विम्याची कमाल हमी रक्कम तीन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असल्याचे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयोगाचे आयुक्त के. के. जालान यांनी सांगितले. हंगामी फायद्यांसह ही रक्कम ३.६ लाखांवर जाईल, असे ते म्हणाले. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना आता १.५६ लाख रुपयांऐवजी ३.६० लाख रुपयांची हमी राहील, असे जालान यांनी नमूद केले.

Leave a Comment