काँग्रेसनेही घेणार सर्व २८८ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती

congress
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनेही सर्व २८८ मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसने यापूर्वीच १७४ मतदरासंघातील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्या असून उर्वरित ११४ जागांसाठीच्या मुलाखती रविवारी घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात अद्यापी जागावाटपाचा तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने सर्व २८८ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. याचाच अर्थ त्यांची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे सूचित करतानाच त्यांनी काँग्रेसवर दबाव टाकण्याची संधीही साधली आहे.

मात्र काँग्रेसनेही सर्व २८८ जागांसाठी मुलाखती घेण्यात येत असल्याचे जाहीर करून राष्ट्रवादीला प्रतिशह दिला आहे असे मानले जात आहे. काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे नबाब मलिक यांना आम्ही मुलाखती घेतल्या म्हणजे स्वबळावर लढणार असे नसल्याचा खुलासा करणे भाग पडले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सर्व मतदारसंघांसाठी पक्षाने इच्छुकांचे अर्ज मागविल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या इच्छुकांच्या मुलाखती बुधवारीच पूर्ण केल्या आहेत.

Leave a Comment