आणंद जिल्हा बनला सरोगरी कॅपिटल

nayana
आणंद- गुजराथेतील आणंद जिल्ह्याने देशाची सरोगसी राजधानी म्हणून आंतरराष्ट्रीय नकाशावर आपले नांव कोरले आहे. या जिल्ह्यत जन्म घेतलेली परदेशी पालकांची मुले विविध ३० देशांत वाढत असल्याचे समजते. एकेकाळी या भागातील जनतेला दोन वेळचे जेवण मिळणे अशक्य होते तेथे आता सरोगसी मदर च्या माध्यमातून त्यांचे जीवनमान सुधारले असल्याचेही सांगितले जात आहे. याचे सारे श्रेय जाते डॉ. नयना पटेल आणि त्यांचे आकांक्षा क्लिनिक यांना.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार आणंद च्या परिसरातील अनेक गावातील महिला सरोगसी (गर्भाशय भाड्याने देणे) साठी उद्युक्त होत आहेत. ज्या जोडप्यांना स्वतःचे मुल हवे पण महिला तिच्या गर्भाशयात ते वाढवू शकत नाही अशी जोडपी सरोगसीच्या माध्यमातून आपले अपत्य मिळवू शकतात. जी महिला हे मूल तिच्या गर्भात वाढविते तिला त्याबदली कांही रक्कम दिली जाते. यालाच सरोगसी असे म्हणतात. आणंद जिल्ह्यात या कामासाठी येणार्‍या परदेशी जोडप्यांची संख्या प्रचंड असून दरवर्षी साधारणपणे २००० जोडपी येथे येतात असे अधिकृत आकडेवारी सांगते.

ज्या महिल सरोगसी मदर म्हणून काम करतात त्यांना नऊ महिने त्यांच्या परिवारापासून दूर राहावे लागते. डॉ. नयना पटेल त्यांना स्वःतच्या किलनिकमध्ये नऊ महिने ठेवून घेतात व त्यांची सर्व काळजी तेथे घेतली जाते. नंतर बाळंतपणानंतर ते मूल त्याच्या मूळ पालकांकडे सोपविले जाते. अनेक पत्रकार आणि परदेशी लोक येथे मुद्दाम येऊन या प्रकल्पाची माहिती करून घेतात असेही समजते.

सर्वप्रथम येथील एका महिलेने एका जपानी जोडप्यासासाठी सरोगसी मदर बनण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला साडेचार लाख रूपये त्याबदल्यात मिळाले. त्यातून तिच्या कुटुंबाची आर्थिक चणचण बर्‍याच अंशी दूर झाली. तिच्या तीन मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. तेव्हापासून येथील अनेक महिलांनी सरोगसी मदर होण्याचा निर्णय घेतला असे सांगितले जाते.

Leave a Comment