सुपरमॅन पहिल्या कॉमिकला मिळाली विक्रमी किंमत

superman
न्यूयॉर्क- जगातील पहिल्या सुपरमॅनचे चित्रातून दर्शन घडविणारे अॅक्शन कॉमिक नंबर १ ची दुर्मिळ प्रत ३२ लाख डॉलर्सला विकली गेल्याचे वृत्त आहे. ही पहिली प्रत १९३८ साली छापली गेली होती. त्यामुळे आता ही प्रत जगातले सर्वाधिक महागडे कॉमिक बुक ठरली आहे.

गेली पंच्याहत्तर वर्षे हा सुपरमॅन लहानग्यांना भुरळ घालत आला आहे. सुपरमॅनची कॉमिक्स वाचणारी पिढी पंच्याहत्तरीची झाली तसाच सुपरमॅनही पंचाहत्तरीचा झाला मात्र अजूनही तो बालजगतात लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान आहे. इतका दीर्घकाळ बालवाचकांना गुंगवून ठेवण्यात यशस्वी झालेला हा सुपरमॅन कॉमिक रूपाने आला तेव्हा त्या पहिल्या प्रतीची किंमत होती १० सेंट. डॉरन अॅडम्स याने ही प्रत ईबे वर लिलाव करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याची सुरवातीची किंमत ९९ सेंट ठरविली गेली मात्र केवळ दोन तासांच्या अवधीत ती १५ लाख डॉलर्सवर गेली आणि अखेर ३२ लाख डॉलर्सला तिची विक्री झाली. प्रिस्टाईन कॉमिक्सच्या मालकाने ही प्रत ३२ लाख ७ हजार ८५२ डॉलर्सला विकली गेल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Comment