मलेशियन एअरलाईन्सकडे कर्मचार्‍यांचा तुटवडा

malaysia
एकापाठोपाठ दोन विमान अपघातांमुळे चर्चेत आलेल्या मलेशियन एअरलाईन्समधून गेल्या कांही महिन्यात २०० केबिन क्रूनी राजीमामे दिल्यामुळे कर्मचार्‍यांचा तुटवडा भासू लागला आहे.परिणामी सध्या असलेल्या कर्मचार्‍यांना १२-१२ तासाची ड्यूटी करावी लागत आहे असे समजते. राजीनामा देणार्‍या क्रूने सुरक्षा आणि भीतीपोटी राजीनामे दिले असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यापूंर्वीपर्यंत मलेशियन एअरलाईन्स उत्तम सुरक्षा रेकॉर्ड असलेली कंपनी होती.

या एअरलाईन्सचे एमएच ३७० हे विमान ८ मार्च रोजी गुढरित्या बेपत्ता झाले आणि त्यातील प्रवासी अथवा विमानाचा अजूनही तपास लागलेला नाही. त्यापाठोपाठ १७ जुलैला युक्रेन भागात याच कंपनीच्या एमएच १७ विमानावर मिसाईल डागण्यात आल्याने २९८ जणांचा मृत्यू झाला. पाठोपाठ ओढविलेल्या या अपघातांमुळे या विमानकंपनीवरील विश्वासाला मोठाच तडा गेला आहे. कर्मचारी युनियनचे महासचिव अब्दुल मलेक आरिफ म्हणाले की कर्मचार्‍यांच्या कुटुंबाकडूनही नोकरी सोडण्यासाठी आग्रह धरला जात आहे आणि विमानातून जायचे याची भीतीही अनेकांना वाटत असल्याने राजीनामे देण्याचे सत्र सुरू झाले आहे.

Leave a Comment