पूर्व किनारयावर होतोय नौदलाचा प्रमुख तळ

vizac
भारताच्या पूर्व किनार्‍यावर विशाखापट्टणम जवळ भारतीय नौदलाचा प्रमुख तळ उभारण्याचे काम सुरू असून भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत तसेच न्यूक्लिअर बॅलेस्टीक मिसाईल पाणबुड्यांसाठी हा तळ वापरला जाणार असल्याचे ईस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल सतीश सोनी यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे असा तळ उभारण्यात येत आहे याचा संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने इन्कार केला जात होता. सोनी यांच्या खुलाशाने आता ही गुप्तता संपुष्टात आली आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या या तळाच्या प्रकल्पाचे नामकरण प्रोजेक्ट वर्षा असे करण्यात आले आहे.

शेजारी चीनने त्यांच्या नाविक दलाचा झपाट्याने केलेला विस्तार आणि आसपासच्या प्रदेशातील सागरी सीमांवर सातत्याने हक्क प्रस्थापित करण्याचे चालविलेले प्रयत्न ही भारतासाठी नक्कीच चिंतेची बाब असल्याचे जाणकाराचे मत आहे. हा नवा तळ त्यादृष्टीनेही भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. बंगालच्या खाडीतील हा भाग पाणबुड्या आणि विमानवाहू नौकांसाठी अतिशय योग्य आहे कारण येथे समुद्राची खोली अधिक आहे. यामुळे नेहमीच्या गस्तीसाठी बाहेर पडत असलेल्या पाणबुड्या उपग्रहांच्या नजरेत न येताही त्यांची कामगिरी पार पाडू शकणार आहेत. भारत सहा मिसाईल पाणबुड्या बांधत असून त्यातील पहिली आयएनएस अरिहंत तयार झाली आहे. अन्य दोन पाणबुड्या तयार करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment