कांदा जीवनावश्यक वस्तू यादीत येणार

onion
पुणे – केंद्र सरकारने कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट करण्याचा संबंधी विचार चालविला असल्याच्या वृत्ताने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. कांद्याला जीवनावश्यक वस्तूत सामील करतानाच त्यांची आधारभूत किमतही ठरविली जाणार आहे. तसेच कांदा वाहतुकीसाठी रेल्वेभाड्यात सवलतही दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत येण्याच्या वार्तेमुळे कांदा उत्पादक मात्र घाबरले आहेत. महाराष्ट्रात कांदा लिलावाचे मुख्य केंद्र असलेल्या लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नानासाहेब पाटील या संदर्भात माहिती देताना म्हणाले की देशात महाराष्ट्र हे प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहे. अनेकदा शेतकर्‍यांना कांदा पीक वाया जाण्यामुळे नुकसान सोसावे लागते त्यामुळे शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले पाहिजेत हे मान्य असले तरी कांद्याला जीवनावश्यक वस्तूत समाविष्ट करणे योग्य नाही. कारण या यादीतील वस्तू ठराविक मर्यादेपलिकडे साठविता येत नाहीत. त्यामुळे कांदा उत्पादकांना कांदा चाळीत कांदा साठविणे शक्य होणार नाही. तसेच मार्च ते सप्टेंबर या काळात कांदा उत्पादन होत नसल्याने त्या काळात कांदा पुरवठा करणेही अशक्य होणार आहे. त्यामुळे तो जीवनावश्यक वस्तू यादीत गेला तर शेतकर्‍यांचे नुकसानच होणार आहे.

Leave a Comment