हद्दीच्या वादात पॅसेंजर रखडली कोरे

kokan-railway
रोहा – हद्दीच्या वादावरून दादर सावंतवाडी पॅसेंजर गणपती उत्सवासाठी कोकणात घराकडे निघालेल्या मुंबईकरांसह आज मागील दीड तासांपासून रोहा स्थानकात रखडली आहे.

कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेमध्ये गणपतीसाठी सोडलेल्या विशेष गाड्यांवरील मध्य रेल्वेच्या ड्रायव्हर आणि गार्ड यांची ड्युटी रत्नागिरी पर्यंत असल्याचा करार झाला असून याबाबत ड्रायव्हर-गार्डच्या युनियनला नीट कळवले नसल्याने अनेक ड्रायव्हर आणि गार्ड रोहा स्थानकात वाद घालत आहेत.

आज दादर-सावंतवाडी पॅसेंजर या वादामुळे तब्बल दीड तास रोह्यामध्ये रखडली आहे. रविवारी घसरलेल्या मालगाडीमुळे कोलमडलेले वेळापत्रक, गणपतीसाठी सोडलेल्या विशेष गाड्या आणि मध्य रेल्वेच्या ड्रायव्हर-गार्डनी घातलेला हद्दीचा वाद यामुळे सुरू झालेला गोंधळ अद्यापही सुरूच आहे.

आज मंगळवारी दुपारी रोहा ते रत्नागिरी दरम्यान तब्बल ३० गाड्या या सर्व गोंधळामुळेच रखडल्या आहेत. या गोंधळाचा सर्वाधिक फटका गणपतीसाठी गावी निघालेल्या अनेक प्रवाशांना बसला असून मुंबई सीएसटी, कुर्ला, वसई, पनवेल इथून लाखो चाकरमानी कोकणातील घराकडे निघाले आहेत. पण वाहतुकीच्या या गोंधळामुळे ते कधी घरी पोहचतील याचा नेम नाही.

Leave a Comment