नदी पात्रात सापडले हजारो आधार कार्ड

aadhar-card
ठाणे – भारतीयांना आपली ओळख मिळवून देण्यासाठी युपीए सरकारने देशभरात आधार कार्डची योजना राबवली. मात्र, या योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून, कल्याण परिसरात नदीपात्रात हजारो आधार कार्ड आढळून आले आहेत. ही बाब येथील माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या सतर्कतेमुळे उजेडात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून त्यात आपले आधार कार्ड तर नाही ना हे पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. पण ही सर्व आधार कार्ड भिवंडी परिसरातील असल्याचे समजल्यावर गर्दी ओसरली.

सुरेश भोईर यांनी हा प्रकार उघडकीस आणला. हनुमान मंदिराच्या भोवताली नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी शासकीय यंत्रणा आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

संबंधित आधारकार्ड हे भिवंडी तालुक्यातील कामतघर परिसरातील आहेत. काही कार्ड अर्धी फाटलेली, तर काही अखंड आहेत. पोलिसांनी पंचनामा करुन सदर आधारकार्ड ताब्यात घेतले आहेत.

ही आधारकार्ड नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकारने पोस्टाला दिली आहे. आपण पंचनामा करुन आधारकार्ड ताब्यात घेणार आहोत, असे कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले.

Leave a Comment