‘जन धन’ योजनेअंतर्गत प्रत्येकाला मिळणार विमा व बँक खाते

narendra-modi
नवी दिल्ली – येत्या २८ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘प्रधानमंत्री जन धन’ योजनेचा शुभारंभ होणार असून या योजनेंतर्गत प्रत्येक नागरिकाला विमा पॉलिसीचे कव्हर आणि हक्काचे बँक खाते मिळणार आहे.

स्वातंत्र्य दिनी या योजनेची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती. ‘सबका साथ सबका विकास’ हा सिद्धांत डोळ्यापुढे ठेवून ही योजना एकाचवेळी देशभरात राबविण्यात येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक खातेधारकाला एक लाख रुपयांच्या अपघात विमा कव्हरसह ‘रुपे’ डेबिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच, बँक खातेधारकाला विमा व पेन्शनची जोड देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी आज योजना राबविण्याचा निर्णय जाहीर करताना केली.

मोदी यांनी सर्वच बँकांना ई-मेल पाठविला असून, त्यात प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्याला राष्ट्रीय प्राधान्य देण्यात यावे आणि एकही नागरिक बँक खात्याशिवाय राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.

Leave a Comment