मोदी लाटेवर विसंबून राहू नका – उद्धव ठाकरे

uddhav
मुंबई – भाजपला नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पराभवाची चव चाखावी लागली असतानाच शिवसेनेनीही या पराभवरुन भाजपला चिमटा काढला असून नुसत्या हवेवर निवडणुका जिंकता येत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची ‘हवा’ आणि ‘गणिते’ वेगळी असतात हा धडा या पोटनिवडणुकीतून मिळाला आहे असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सध्या जागावाटपावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरु असून लोकसभेतील यश पाहता आम्हाला जागा वाढवून दिल्या पाहिजेत असे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, शिवसेना त्यासाठी तयार नसून लोकसभेसाठी भाजप मोठा भाऊ तर विधानसभेसाठी शिवसेना मोठा भाऊ हे सूत्र स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी घालून दिले होते. त्यानुसार जागावाटप व्हावे असे सेनेचे म्हणणे आहे. मात्र लोकसभेत जबरदस्त असा विजय मिळाल्यानंतर भाजप सातव्या अस्मानवर आहे. मोदींची देशात हवा असल्याची नुकत्याच झालेल्या काही राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकालामुळे धुळीस मिळाले आहेत. यावरून शिवसेनेने भाजपचा चोपण्याची संधी गमावली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत देशाचा कारभार चोख करण्यासाठी लोकांनी भरभरून मते दिली होती. त्यानंतर आता काही राज्यांत विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. त्याचे निकाल संमिश्र लागले आहेत. या सर्व निकालांचा अर्थ इतकाच की, उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपसह महायुतीस कंबर कसून कामास लागावे लागेल. लोकांना महाराष्ट्रात सत्ताबदल करायचा आहे, पण नुसत्या हवेवर निवडणुका जिंकता येणार नाहीत. राज्याची हवा व गणिते वेगळी असतात, ती बिघडू नयेत यासाठी बिहार, कर्नाटकातील निकालांचा अभ्यास करावाच लागेल. मध्य प्रदेशात तीन जागांपैकी एका जागेवर कॉंग्रेसने विजय मिळवला. पंजाबातही दोनपैकी एक जागा कॉंग्रेसने जिंकली. कर्नाटकात तीनपैकी दोन जागा कॉंग्रेसने जिंकल्या.

Leave a Comment