ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांच्या मानधनात वाढ

cm
मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला असून या निर्णयानुसार आता राष्ट्रीय स्तरावरील ‘अ’ दर्जाच्या कलावतांना दरमहा १४०० रुपयांऐवजी २१०० रुपये मानधन मिळणार आहे, तर राज्यस्तरावरील ‘ब’ दर्जाच्या कलावंतांना १२०० रुपयांऐवजी आता दरमहा १८०० रुपये मानधन मिळेल. ‘क’ दर्जाच्या स्थानिक कलावंतांना १००० रुपयांऐवजी दरमहा १५०० रुपये एवढे मानधन मिळणार आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना आधार देण्यासाठी सदर योजना राबविली जात आहे. मात्र, सरकारकडून कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि उतरत्या वयात त्यांना मदत होईल या उद्देशाने दिले जाणारे हे मानधन अत्यल्प असल्याने, याची फार मदत होत नाही. आता त्यात दीडपट वाढ करण्यात आली असल्याने थोडी अधिकची मदत ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांना मिळणार आहे.

Leave a Comment