काही दिवसातच काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोडणार कंबरडे – एकनाथ खडसे

eknath-khadse
मुंबई- विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज एक सनसनाटी खुलासा केला असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील सुमारे ३२ बडे नेते भाजपच्या संपर्कात असून, आठवड्याभरात ते प्रवेश करणार असल्याचा दावा केला असून यात माजी केंद्रीय मंत्री, राज्यातील आजी-माजी मंत्री, माजी खासदार-आमदार व विद्यमान आमदारांचा समावेश असल्याचीही माहिती खडसे यांनी दिली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते व अनुभवी नेते असलेल्या एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, माजी केंद्रीयमंत्री सुर्यकांता पाटील, गोविंदराव अदिक, बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित, भास्करराव-पाटील खतगावकर, अशोक चव्हाणांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणारे माधव किन्हाळकर, मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यासह माजी खासदार व आजी-माजी आमदारासंह सुमारे ३०-३२ बडे नेते भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, आम्ही आमच्या धोरणानुसार सरसकट प्रवेश न देता काही अटींवर त्यांना प्रवेश देणार आहोत.

याचबरोबर ज्या मतदारसंघात आमचे उमेदवार 10 हजार मतांपेक्षा कमी मतांनी पराभूत झालेले आहेत अशा ठिकाणी इतर पक्षांतील नेत्यांना घेऊन उमेदवारी देणार नाही. तसेच ज्या-ज्या मतदारसंघात आमचा उमेदवार कधीही विजयी झाला नाही अशा मतदारसंघात सद्य परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे धोरण ठरले आहे. या परिस्थितीतही अपवादात्मक निर्णय होऊ शकतात. मात्र, राष्ट्रवादीतील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. मात्र, सर्वांना प्रवेश देणे शक्य नाही. काही जणांच्या काही मागण्या आहेत तर, काहींना उमेदवारी हवी आहे. काहींनी कोणत्याही अटींशिवाय पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येत्या आठवड्याभरात यातील आमच्या धोरणानुसार प्रवेश देणार आहोत, असेही एकनाथ खडसे यांनी बोलताना सांगितले.

Leave a Comment