आज टीम इंडिया काढणार का वचपा?

dhoni
ब्रिस्टल – महेंद्रसिंह धोनी आणि कंपनी कसोटी मालिकेतील मानहानीकारक पराभव मागे टाकत एकदिवसीय मालिकेत नव्याने प्रारंभ करण्यासाठी उत्सुक असून आजपासून इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच लढतींच्या एकदिवसीय मालिकेला ब्रिस्टलच्या कौंटी मैदानावर सुरुवात होत आहे.

आगामी विश्वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होत असल्याने इंग्लंडमधील कामगिरीवर अनेकांचा विश्वचषकातील सहभाग अवलंबून राहील. परिणामी भारताचा १७ जणांचा संघ निवडण्यात आला आहे. शिखर धवनच्या साथीने रोहित शर्मा डावाची सुरुवात करेल. त्यानंतर विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा असा भारताचा फलंदाजीचा क्रम असेल तर कर्णधार धोनी किती गोलंदाजांसह खेळतो की नाही, यावर ऑफस्पिनर आर. अश्विनसह अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीचा समावेश अवलंबून आहे.

सलग तीन कसोटी जिंकताना मालिका जिंकणा-या कुक आणि सहका-यांचा आत्मविश्वास उंचावला असून मायदेशात एकदिवसीय मालिकेत त्यांनी श्रीलंकेने हरवले होते. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे नियोजित कर्णधार आणि वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडविना इंग्लंडला खेळावे लागत आहे. मधल्या फळीतील रवी बोपारा, वेगवान गोलंदाज टिम ब्रेस्नन आणि मायकेल कॅरबेरीलाही संधी मिळालेली नाही. ब्रॉडची जागा फिन घेईल. तडाखेबाज हॅलेक्सच्या समावेशामुळे आघाडी फळी मजबूत झालीय. कर्णधार कुकसह तो डावाची सुरुवात करेल. इयन बेल, ज्यो रूट, इयॉन मॉर्गन आणि जोस बटलर असे चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. कसोटी मालिका गाजवलेला वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ऑफब्रेक मोइन अलीवर त्यांची सर्वाधिक भिस्त आहे.

Leave a Comment