इबोलापासून बचाव कसा करावा?

ebola
सध्या सार्‍या जगामध्येच इबोला व्हायरसमुळे मोठी घबराट निर्माण झाली आहे. तूर्तास तरी लायबेरिया, सिएरा, लेओने, गिनीया आणि नायजेरिया या देशांपुरताच हा व्हायरस मर्यादित आहे. परंतु या व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण मरण पावतात असा अनुभव येत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात अजून त्याचा उपद्रव झालेला नाही, परंतु जागतिक आरोग्य संघटनेने भारतीयांना या व्हायरसपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

ही सावधानता बाळगण्यासाठी पश्‍चिम आफ्रिकेच्या देशांमध्ये प्रवास करू नका. ज्या भागामध्ये या रोगाचा प्रकोप झाला असेल त्या भागात जाताना बेसावध राहू नका. या रोगाची लक्षणे आणि त्याच्या प्रसारणाचे माध्यम, त्याच बरोबर प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती करून घ्या, अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या आहेत.

ज्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत दक्षता घेतली जात नाही त्या ठिकाणी या रोगाचा धोका असतो. सुरुवातीच्या काळात डोळे आणि त्वचा यातून तो शरीरात प्रवेश करतो. अन्न आणि पाणी त्याची माध्यमे होत. तेव्हा वारंवार हात स्वच्छ धुवा. ज्यात ६० टक्के आणि त्यापेक्षा अधिक अल्कोहोल असेल असे सॅनिटायझर वापरा, अशा या सूचना आहेत.

इबोला व्हायरसपासून संरक्षण करून घेण्याचा एक उपाय म्हणजे पाळीव प्राण्यांपासून शक्यतो दूर राहणे. विशेषत: कच्चे अन्न न खाणे. ज्या प्राण्यांचे मांस आपण खात आहोत त्या प्राण्यांविषयी आधी चौकशी करणे. एबोलाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे रक्त आणि शरीरातील अन्य स्राव यापासून दूर रहा.