प्रुफ रिडिंग

proofreader
भारतातच सगळीकडे मुद्रण आणि प्रकाशन व्यवसाय प्रचंड वेगात वाढत चालला आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लिहिणार्‍यांची आणि वाचणार्‍यांची संख्याही वाढत आहे आणि परिणामी बर्‍याच संख्येने नवनवी पुस्तके बाजारात येत आहेत. आपण पुस्तकाच्या दुकानावर सहज नजर टाकली तरी कितीतरी नव्या नव्या विचारांची नवनवी पुस्तके बाजारात आल्याचे लक्षात येते. जशी नवी पुस्तके बाजारात येत आहेत तशी पुस्तके विकत घेऊन वाचण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पूर्वीच्या काळापेक्षा आजच्या काळात पुस्तकाचे प्रकाशन करणे हेही सोपे झाले आहे. संगणकीय अक्षरजुळणी, अत्याधुनिक छपाई यंत्रे यामुळेही पुस्तकांचे प्रकाशन स्वस्तही झाले आहे. पूर्वी म्हणजे अक्षरजुळणीचे तंत्रज्ञान उपलब्ध होण्याच्यापूर्वी सार्‍या महाराष्ट्रात मिळून काही शे पुस्तकेसुध्दा प्रकाशित होत नव्हती. परंतु आता दरसाल हजारो नवी पुस्तके प्रकाशित होत आहेत आणि विक्रीस येत आहेत. या वाढत्या व्यवसायाने उपलब्ध करून दिलेला एक सोपा आणि बिन भांडवली तसेच सुशिक्षित माणसाला करता येईल असा व्यवसाय म्हणजे प्रुफ रिडिंग किंवा मुद्रित शोधन. या व्यवसायाला जोडून आणखी एक व्यवसाय विकसित झाला आहे तो म्हणजे अक्षरजुळणी.

जुळारी, कंपोझिटर किंवा डीटीपी ऑपरेटर म्हणून नोकरी न करता आपण घरी बसूनही अक्षरजुळणीची कामे करून देऊ शकतो. मात्र त्यासाठी आपले स्वतःचे डीटीपी यंत्र असले पाहिजे. म्हणजेच भांडवलाची गुंतवणूक केली पाहिजे. खरे म्हणजे हाही एक चांगला व्यवसाय आहे परंतु आपण सध्या बिन भांडवली धंद्यांचीच चर्चा करत असल्यामुळे डीटीपी ऑपरेटिंगच्या व्यवसायाविषयी काहीही लिहिणार नाही. प्रुफ रिडरचे काम मात्र बिनभांडवली आहे. तसा विचार केला तर काही वृत्तपत्रांमध्ये, साप्ताहिकांमध्ये पूर्णवेळ प्रुफरिडिंग करणारे प्रुफरिडर असतात. परंतु स्वतंत्र वृत्तीच्या लोकांनी कोणत्याही एका संस्थेची बांधिलकी न स्वीकारता प्रुफ रिडिंगचा व्यवसाय केला तर त्याला नोकरीपेक्षा अधिक पैसे मिळू शकतात. असा व्यावसायिक प्रुफरिडर छापखान्यातून किंवा प्रकाशकाकडून दुरूस्ती करावयाची प्रुफे घरी आणून तपासून नेऊन देऊ शकतो. त्या बदल्यात त्याला प्रत्येक पानाला काही विशिष्ट रक्कम मिळू शकते आणि नोकरी न करता हेच काम व्यवसाय म्हणून करता येते. लहान लहान छापखान्यांना म्हणजे जिथे मोठा मजकूर कंपोझ केला जात नाही. अशा छापखान्यात स्वतंत्रपणे पूर्णवेळ नोकरी करणारा प्रुफ रिडर ठेवणे परवडत नाही. अशा छापखान्यातली कामे व्यवसाय म्हणून करून दिल्यास ते त्यांनाही परवडते आणि प्रुफ रिडरलाही परवडते.
नोकरी म्हणून प्रुफ रिडिंग करणार्‍यापेक्षा व्यवसाय म्हणून करणारा प्रुफ रिडर अधिक पैसे कमवू शकतो आणि तो स्वतंत्र असतो. या व्यवसायाविषयी लोकांचे फार गैरसमज आहेत. प्रुफ रिडर म्हणून काम करण्यासाठी व्याकरणाचे फार ज्ञान लागते असा लोकांचा गैरसमज आहे. खरे म्हणजे व्याकरणाचे ज्ञानसुध्दा असायला काही हरकत नाही. शेवटी आपल्या मातृभाषेचेच ते व्याकरण आहे. ते आपल्यासाठी काही अनाकलनीय असणार नाही परंतु व्याकरण नावाची काहीतरी भयानक गोष्ट आहे असा सार्वत्रिक समज आहे आणि ते शिकून घेण्याची मनाची अजिबात तयारी न करणारे लोक दुसर्‍यांच्याही मनामध्ये व्याकरणाविषयी दहशत निर्माण करत असतात. मात्र प्रुफ रिडिंगच्या व्यवसायाला तशी काही गरज नाही. आपल्या समोर असलेले मुद्रित जसे लिहिले आहे तसाच मजकूर जुळणी करणार्‍यांनी टाईप केला आहे की नाही एवढेच बघावे लागते. र्‍हस्व, दीर्घ आणि रफार अनुस्वार यांचे नियम प्रुफ रिडरला पाठच असले पाहिजेत याचे बंधन नाही. त्याला ते पाठ असतील तर ते बरेच आहे पण पाठ असावेत ही अट नाही. मूळ कॉपी बरहुकूम मजकूर कंपोझ झाला आहे की नाही हे मूळ कॉपी समोर ठेवून बघणे हेच त्याचे काम असते. तेव्हा व्याकरणाचा बाऊ करण्याची गरज नाही.

या उपरही व्याकरणाचे आणि भाषेेचे उत्तम ज्ञान असेल तर प्रुफ रिडिंगची पुढची पायरीही गाठता येते. ती म्हणजे पुस्तकांचे संपादन. संपादन करताना संपादक पुस्तकाची भाषासुध्दा बदलतो. मूळ कॉपी बरहुकूम दुरूस्त्या करण्यापेक्षा मूळ कॉपीत काही दोष असेल तर तोही दुरूस्त करण्याचे काम ग्रंथाचा संपादक करत असतो आणि त्याला या कामाबद्दल प्रुफ रिडिंगपेक्षा जास्त पैसे मिळतात. मात्र हे काम मिळवण्यासाठी वाचन आणि ज्ञान या दोन्हींची आवश्यकता आहे. प्रुफ रिडिंग आणि संपादनाचे काम संगणकावरही करता येते. संपादित किंवा मुद्रित शोधन करावयाचा मजकूर संगणकाच्या स्क्रिनवर घेऊन स्क्रिनवरच दुरूस्त्या करता येतात. त्यामुळे कागदावर प्रिंट काढण्याची गरज राहत नाही. विशेष म्हणजे प्रुफ रिडिंगचा व्यवसाय करत करत पैसे मिळाल्यानंतर एखादा संगणक घरी विकत घेतला आणि त्याला इंटरनेटचे कनेक्शन जोडले तर आपण दुसर्‍या गावातून इंटरनेटवर मजकूर मागवून आपल्या घरात बसून प्रुफ रिडिंग करू शकतो. म्हणजे जगातला कुठलाही मजकूर आपण व्यवसायाचा एक भाग म्हणून आपल्या घरी बसून दुरूस्त करू शकतो. अशा रितीने इंग्रजी प्रुफ रिडिंगही करता येते आणि एडिटिंगसुध्दा करता येते. यातून फार मोठी प्राप्ती होणार नाही परंतु हा नोकरीपेक्षा चांगला स्वयंरोजगार आहे.

Leave a Comment