ग्रामस्थांना आता जन्म आणि मृत्यू दाखले ऑनलाईन उपलब्ध

onlien
मुंबई : ग्रामपंचायतीच्या हद्दीत जन्मलेल्या सर्वांना आता आपला जन्म दाखला किंवा ज्यांचा मृत्यू ग्रामपंचायतीच्या हद्दीत झाला आहे अशांच्या वारसांना मृत्यू दाखला ऑनलाईन मिळण्याच्या सुविधेचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

ग्रामविकास विभागाने त्यासाठी संग्राम सॉफ्ट ही आज्ञावली तयार केली असून या आज्ञावलीत आतापर्यंत एक कोटी 78 लाख जन्मनोंदींची तर 78 लाख मृत्यू नोंदीची नोंद केली आहे. ज्या ग्रामस्थांच्या मिळकती ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत त्यांना नमुना 8 चा दाखलाही या आज्ञावलीद्वारे ऑनलाईन मिळणार आहे.

हे दाखले ऑनलाईन मिळविण्यासाठी http://sangram.co.in या संकेतस्थळावर जावे लागेल. ग्रामविकास विभागाने जन्म-मृत्यू व नमुना 8 या नोंदींचे डिजिटायझेशन करण्याची मोहिम राबविली. या सर्व नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या आहेत. नोंदी करण्याचे काम अद्याप सुरु असून या संख्येत भर पडत जाणार आहे.

आज सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमात मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांचा जन्मदाखला ऑनलाईन प्राप्त करून त्याची प्रत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री.धस यांना देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील तसेच मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस.एस.संधु यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

Leave a Comment