ओबामांच्या सुटीला लागली नजर

golf
वॉशिग्टन – अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या अध्यक्षांना इतक्या अनेक बाबींमध्ये लक्ष घालावे लागते की त्यांना सुटीची गरज भासते. बहुतेक अमेरिकन अध्यक्ष वर्षातून एकदा किंवा दोनदा सुटीवर जातात आणि सुटी पुरती उपभोगून पुन्हा रोजची धकधक सहन करण्यासाठी ताजेतवाने होऊन येतात. भारताचे पंतप्रधान मोदी सुटीवर जात नाहीत. पाकिस्तानचे शरीफ यांना सुटीवर जायचे नाही पण तेथील विरोधी पक्ष त्यांना कायमच्या सुट्टीवर पाठविण्याच्या प्रयत्नात आहेत. अमेरिकेत ओबामा स्वतःहूनच दोन आठवड्याच्या सुटीवर नुकतेच जाऊन आले मात्र त्यांच्या या सुट्टीला नक्कीच कोणाची तरी नजर लागली असे म्हणावे लागेल.

अमेरिकेचा अध्यक्ष सुट्टीवर गेला की साऱ्या जगाचे त्याच्याकडे लक्ष असतेच. ओबामाही त्याला अपवाद नाहीत. ते आपल्या बायकामुलांसह सुट्टीवर गेले काय लगेच इराकमधील इस्लामिक अतिरेक्यांची दादागिरी एकदम तेज झाली. ओबामांना झकत कॅमेऱ्यापुढे यावे लागले आणि तेथील गुंडगिरी काबूत आणण्यासाठी अमेरिका त्वरीत पथके रवाना करत असल्याची घोषणा करावी लागली.तोपर्यंतच मिसुरीत दंगे उसळल्याची खबर आली आणि अध्यक्षांना पुन्हा कॅमेऱ्यासमोर येऊन शांतता राखा चे आवाहन करावे लागले.

थोडे हुश्श करून त्यांनी गोल्फ खेळण्याचा आनंद घेतला, सायकल सवारी केली, साशा, मलिया आणि मिशेल यांच्यासोबत थोडी मौजमजा केली आणि खरी सुटी सुरू झाल्याचा निश्वास टाकला तोपर्यंत माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लींटन यांनी ओबामांवर तोफ डागली. ओबामांची विदेश निती कशी चुकीची आहे याचे पाढे वाचले शिवाय जेथे ओबामा सुटीवर गेले आहेत त्याच शहरात जाऊन आपल्या पुस्तकाचे प्रकाशनही केले. वर ओबामांना फोन करून तुमचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता अशी माफीही मागितली.

तोपर्यंत इकडे प्रसारमाध्यमांनी मिसुरी जळत असताना ओबामा गोल्फ खेळत होते असे फोटो प्रसिद्ध करून त्यांना रोम जळत असताना फिडल वाजविणाऱ्या केस्ट्रोच्या पंक्तीला नेऊन बसविले. सोमवारीच ओबामा सुटी संपवून परततात तोच अमेरिकन पत्रकराचा शिरच्छेद इस्लामी अतिरेक्यांनी केल्याच्या घटनेस त्यांना सामोरे जावे लागले आणि विश्रांती पुरी न होताच रोजच्या धकाधकीला तोंड देण्याची पाळी आली.

Leave a Comment