अलवर – नितांतसुंदर राजस्थानी शहर

alwar
संपूर्ण राजस्थानच पर्यटकांना मोहात पाडणारे राज्य असले तरी त्यातील कांही शहरे विशेष सुंदर या कॅटेगरीत येतात. राजधानी जयूपूर पासून १६० किमीवर असलेले अलवर हे त्यातील एक. अरवली पर्वतरांगात वसलेल्या या शहराचे नांव पूर्वकाळी होते शाल्वपूर. या छोट्याशा संस्थानात अनेक सुंदर एतिहासिक इमारती आणि तलाव सरोवरे आहेत. राजस्थानी लोकसंगीत – मेवानी संगीत ही येथील खास ओळख म्हणावी लागेल. राजवाडा, समाधीस्थळे, मंदिरे, सरोवरे, तलाव या प्रेक्षणीय स्थळबरोबर येथील कलाकंद बाजार आणि खास राजस्थानी कारागिरीने नटविलेल्या सोने चांदी दागिन्यांचा सराफा बाजार अवश्य भेट द्यावा असा.

येथील सिटी पॅलेस राजा बख्तावर याने १७९३ साली बांधला. या पॅलेसमधील संग्रहालय ही अतिशय देखणे आहे. विविध प्रकारची भांडीकुंडी, चांदी सोन्याच्या वस्तू, कपडे, हस्तलिखिते, पेंटींग्ज आणि शस्त्रागार ही येथील वैशिष्ट्ये. येथे अकबर आणि जहांगीर यांच्या तलवारी आहेतच पण एकाच म्यानात असलेल्या दोन तलवारीही आहेत.

पॅलेसच्या मागच्या मैदानात कृष्णमंदिर असून जवळच सागर जलाशय आहे. उजव्याबाजूस बख्तावरचे स्मारक संगमरवरात आहे. त्याची राणी मुसी ही त्याच्यासोबत सती गेली म्हणून तिच्या नावाने हे स्मारक ओळखले जाते. त्याला म्हणतात मुसी छतरी. येथून काही अंतरावर असलेला सिलीसेढ जलाशय फार प्रसिद्ध आहे आणि हे सरोवर अतिशय सुंदर आहे. राजा विक्रमसिंगाने १८४५ साली त्याची निर्मिती केली. हिरवाईने नटलेले आजूबाजूचे डोंगर सरोवराला सुंदरतेचे मखर देतात. येथील बाला किल्ला ही सर्वात जुनी इमारत मानली जाते. ती ९८८ सालातली असल्याचे सांगितले जाते. निकुंभ राजपूत याने ही इमारत उभारली.

या शहराची आयुर्वेदिक आणि युनानी औषधांसाठीही खूप प्रसिद्धी आहे. तसेच या शहराच्या आसपास संगमरवर, ग्रॅनाईट, गारगोटी यांच्या मोठ्या खाणीही आहेत. या शहरत रक्षाबंधनादिवशी पतंगमहोत्सव होतो व तो पाहण्यासाठी तसेच शहराला भेट देण्यासाठी वर्षभर पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र येथील तापमान ५० डिग्रींचा पारा गाठते तेव्हा उन्हाळा सोडून येथे जावे हे उत्तम.

दिल्लीपासून केवळ साडेतीन तास तर जयपूरपासून चार तासात या शहरात जाता येते. एका दिवसांत सर्व प्रसिद्ध स्थळे सहज पाहून होतात. मात्र मुक्काम टाकायचा असला तरी त्यासाठी आवश्यक सुविधाही आहेतच.

Leave a Comment