मोदींच्या कार्यक्रमावर मुख्यमंत्री चव्हाणांचा बहिष्कार

modi
नागपूर – सोलापूरातील मोदींच्या कार्यक्रमात घडलेल्या प्रकारानंतर आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूरात होत असलेल्या मेट्रो भूमिपूजन समारंभाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कालच पत्रकारांना सांगण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूरात चार पदरी राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र त्यांचे भाषण सुरू असतानाच तेथे जमलेल्या मोदी समर्थकांनी मोदींच्या नावाचा गजर करून मुख्यमंत्र्यांचे भाषण बंद पाडले. ही घटना अतिशय दुर्देवी असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले आणि मोदीं च्या हस्ते होणार्‍या कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत या संदर्भात म्हणाले की मोदींची हुकुमशाही मेंटॅलिटी खरी होताना आता दिसू लागले असून ज्या राज्यांत काँग्रेस सरकार आहे तेथील मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. हरियानातही असाच मुख्यमंत्र्यांचा पाणउतारा केला गेला. भविष्यात असले प्रकार अथवा घटना सहन केल्या जाणार नाहीत.

महाराष्ट्र भाजप नेते व विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी मात्र यात भाजपचा कोणताही कावा अथवा वाईट हेतू नव्हता आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हा प्रोटोकॉल असल्याने मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे असे मत व्यक्त केले आहे.

Leave a Comment